लोणी काळभोर, माणला राष्ट्रीय मानांकन

By Admin | Updated: July 5, 2016 03:06 IST2016-07-05T03:06:20+5:302016-07-05T03:06:20+5:30

पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गेल्या काही वर्षांत केलेल्या भरीव कामांना यश येत असून, लोणी काळभोर व माण या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांना एनएबीएच राष्ट्रीय मानांकन जाहीर झाले.

Loni Kalbhor, Manala National Rating | लोणी काळभोर, माणला राष्ट्रीय मानांकन

लोणी काळभोर, माणला राष्ट्रीय मानांकन

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गेल्या काही वर्षांत केलेल्या भरीव कामांना यश येत असून, लोणी काळभोर व माण या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांना एनएबीएच राष्ट्रीय मानांकन जाहीर झाले. २५ केंद्रांनी तयारी केली. त्यांपैकी १३ केंद्रांची नुकतीच तपासणी झाली होती.
गेल्या वर्षी २५ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे नामांकनासाठी अर्ज दाखल झाले होते. यात सांगवी, मोरगाव, काटेवाडी, कुरकुंभ, खामगाव, लोणी काळभोर, उरुळी कांचन, वाघोली, वाडेबोल्हाई, कुंजीरवाडी, निमगाव सावा, सावरगाव, राजुरी, शेलपिंपळगाव, आंबोली, डेहणे, करंजविहिरे, कामशेत, टाकवे, माण, बेलसर, रांजणगाव, करडे, टाकळी हाजी, करंजावणे या केंद्रांनी अर्ज केले होते. यापैकी १३ केंद्रांची नुकतीच राष्ट्रीय समितीने पाहणी केली होती.
पायाभूत सुविधा, मनुष्यबळ, वैद्यकीय सेवा गुणवत्तेच्या आहेत का, कायदेशीर बाबींची पूर्तता केली आहे का आणि दिलेली उद्दिष्टे पूर्ण केली आहेत का या निकषांच्या आधारे दोन तपासण्या होतात. पहिल्या तपासणीत काही त्रुटी असतील तर त्या दूर करण्याची संधी असते. दुसऱ्या तपासणीनंतर निवड केली जाते. १३ केंद्रांची तपासणी झाली होती. त्यांपैकी हवेलीतील लोणी काळभोर व मुळशीतील माण या प्राथामिक आरोग्य केंद्रांची निवड झाल्याचे राष्ट्रीय आरोग्य मानांकन समितीच्या उपसंचालक दीप्ती मोहन यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

लोणी काळभोर मॉडेल आरोग्य केंद्र
खासगी रुग्णालयाच्या तोडीची इमारत, आत प्रवेश करताच भासणारी प्रसन्नता, खासगी दवाखान्यासारखी स्वच्छता, डॉक्टर व सर्वच कर्मचाऱ्यांची तत्परता व रुग्णांशी जिव्हाळ्याचे नाते या वैशिष्ट्यांसमवेत येथे तत्परतेने मिळणारी सेवा या सर्व कारणांमुळेच लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे महाराष्ट्रातील मॉडेल आरोग्य केंद्र म्हणून नावाजले गेले आहे. म्हणून या केंद्राला नॅशनल अ‍ॅक्रिडेशन बोर्ड हॉस्पिटल अँड हेल्थ केअर प्रोव्हायडर (एनएबीएच) या राष्ट्रीय नामांकनासाठी निवड झाली.

- चार ते पाच वर्षांपूर्वी येथे अवघे चाळीस ते पन्नास रुग्ण उपचारासाठी येत असत. परंतु आज या परिसरांत अनेक खासगी रुग्णालये असताना येथे प्रतिदिवशी हाच आकडा दोनशे ते अडीचशेपर्यंत जातो. २०१४-१५ या वर्षात या आरोग्य केंद्रामध्ये ११७५ महिलांची प्रसूती झाली असून एकूण ५३ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
ही आकडेवारी देशातील इतर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या तुलनेत कितीतरीपटीने अधिक असल्याने लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राने या दोन्ही बाबतीत महाराष्ट्र राज्यातच नव्हे, तर देशात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे.

आरोग्य केंद्राच्या वतीने महिलांना प्रसूतीसाठी आणणे. प्रसुती झाल्यानंतर आईला सकस आहार देणे याचबरोबर शारदा ग्राम आरोग्य संजीवनी कार्यक्रमांतर्गत माता व बाळासाठी कपडे, स्वच्छतेची साधने दिली जातात व त्यांना घरी पोहोचवण्याची सोय केली जाते. याचबरोबर कमी वजनाच्या बाळासाठी रेडिएन्ट वॉर्मर ही सुविधाही उपलब्ध आहे. या ठिकाणी एकूण बारा प्रकारच्या रक्त तपासणी करण्यासाठी अद्ययावत प्रयोगशाळा, प्रसूतिगृह, मधुमेह व उच्च रक्तदाबाची तपासणी, मणक्याच्या आजाराने त्रस्त झालेल्या रुग्णांसाठी ट्रॅक्शन सुविधा आहेत़ आरोग्य केंद्राची इमारत सुसज्ज व आकर्षक असून या ठिकाणी स्वच्छता व रुग्णसेवेला प्राधान्य दिले जाते.

- इमारतींची देखभाल, आवश्यक सुविधा, उपकरणे, कर्मचारीवर्ग उपलब्ध होणार आहे. रुग्णसेवा दर्जेदार होण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, रुग्णांचे हक्क-कर्तव्य, आरोग्य कर्मचाऱ्यांचे हक्क-कर्तव्य याबाबत जागृती केली जाणार आहे.
- विविध सेवांचे वेळोवेळी आॅडिट केले जाणार आहे. आरोग्यसेवेची सर्व उद्दिष्टे गुणवत्तापूर्वक पूर्ण केली जातील यासाठीचे नियोजन केले जाईल. रुग्णालयात निर्माण होण्याच्या जैववैविध्य कचऱ्याचे निर्मूलन शास्त्रीयदृष्टीने केले जाईल, याकडे विशेष लक्ष दिले जाईल.


५0 आरोग्य केंद्रे या दर्जाची करणार
सन २0१६-१७ या वर्षाकरिता आणखी २५ प्राथमिक आरोग्य केंद्रांची राष्ट्रीय मानांकनासाठी निवड करण्यात आली असून, मार्च २0१७ अखेर जिल्ह्यातील ५0 आरोग्य केंद्रांना हे मानांकन मिळेल अशी दर्जेदार सेवा येथे दिली जाईल.- प्रदीप कंद,
अध्यक्ष, जिल्हा परिषद

Web Title: Loni Kalbhor, Manala National Rating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.