पालखी सोहळ्याची लगबग
By Admin | Updated: June 24, 2016 01:57 IST2016-06-24T01:57:49+5:302016-06-24T01:57:49+5:30
संतश्रेष्ठ ज्ञानदेव माऊलींचा पालखी सोहळा संत सोपानदेवांच्या सासवडभूमीत दिनांक १ जुलै रोजी येत असून, त्या पार्श्वभूमीवर सासवड नगरपालिकेसह शासनाचे आरोग्य

पालखी सोहळ्याची लगबग
सासवड : संतश्रेष्ठ ज्ञानदेव माऊलींचा पालखी सोहळा संत सोपानदेवांच्या सासवडभूमीत दिनांक १ जुलै रोजी येत असून, त्या पार्श्वभूमीवर सासवड नगरपालिकेसह शासनाचे आरोग्य, बांधकाम, विद्युत आणि महसूल विभाग स्वागताच्या तयारीला लागल्याचे चित्र आहे.
जागोजागी रस्त्यांची डागडुजी, पालखीतळ परिसराची स्वच्छता, सुरळीत आणि अखंडित विद्युतपुरवठा, पिण्याच्या पाण्याचे उद्भव ताब्यात घेऊन ते निर्जंतुकीकरण करणे, वारीतील वारकऱ्यांच्या सोयीसाठी पुरेसा रॉकेलसाठा तसेच औषधे उपलब्ध करणे, सोहळाकाळात पुरेसा पोलीस बंदोबस्त, पालखी मार्गावरील हॉटेल व्यावसायिक आणि अन्य विक्रेते यांना सूचना देणे, या आणि यासारख्या अनेक कामांबाबत संबंधित खात्याची मंडळी कामाला लागल्याचे चित्र आहे. संतश्रेष्ठ सोपानदेवांच्या पालखीचे पंढरपूरकडे दि.२ जुलैला प्रस्थान होत आहे. त्या अनुषंगानेही तेथे तयारीच्या कामाला वेग आला आहे. माऊलींचा सासवड येथे दोन दिवस मुक्काम असून, रविवार दि. ३ जुलैला हा सोहळा जेजुरीकडे मार्गस्थ होईल.
पालखीसोहळ्याकरिता सासवड नगरपालिकेकडून विविध स्वरूपाची कामे सुरू करण्यात आल्याचे मुख्याधिकारी विनोद जळक आणि नगराध्यक्ष आनंदीकाकी जगताप यांनी सांगितले. शहरातील प्रमुख मार्गांवर रस्त्यांची दुरुस्ती, पालखीतळावरील साफसफाई, या प्रमुख कामांबरोबरच तळावर विद्युतीकरण, तात्पुरत्या स्वरूपातील शौचालयांची उभारणी, शहरातील पाण्याचे उद्भव निजंर्तुकीकरण करणे, वाढीव हद्दीतील स्वच्छता,पुरेशा पाणीपुरवठ्यासाठी अधिक नळकोंडाळी उभारणे, परीसरातील खाजगी विहिरी अधिग्रहित करून त्या निजंर्तुकीकरण करणे , चंदन टेकडी आणि जेजुरी नाके येथे स्वागतकमानी उभारणे ,सोपानदेव मंदिराच्या परिसरातील स्वच्छता आणि अन्य सुविधा इत्यादी कामांना येत्या काही दिवसात गती येणार असल्याचे पालिकेचे खातेप्रमुख माऊली गिरमे, मोहन चव्हाण, प्रवीण जगताप आदींनी सांगितले. पुरंदरमधील आरोग्य विभागही कामाला लागल्याचे चित्र आहे. पालखीकाळात १२० कर्मचारी, १० वैद्यकीय अधिकारी यांच्यासह दोन रुग्णवाहिका, पुरेसा औषधसाठा, ५ वाहने तैनात केली आहेत. पालखीतळावर २४ तास वैद्यकीय सेवा उपलब्ध केल्याचे डॉ. कराळे यांनी सांगितले. (वार्ताहर)
सोयीसुविधा उपलब्धतेसाठी सतर्क राहा
बारामती : बारामती तालुक्यात जगदगुरू तुकोबा व संत सोपानकाका पालखी सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही. त्यांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने सतर्क राहून सामाजिक बांधिलकेतून काम करावे, अशा सूचना तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी आढावा बैठकीत दिल्या.
नवीन प्रशासकीय इमारतीत जगदगुरू तुकोबा व संत सोपानकाका पालखी सोहळा पूर्वतयारीसाठी आढावा बैठक तहसीलदार चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी बारामती शहर पोलीस निरीक्षक विजय जाधव, गटविकास अधिकारी मोरे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन पाटील, तलाठी, ग्रामसेवक, रॉकेल विक्रेते, गॅस एजन्सीचे प्रतिनिधी, विविध विभागांचे शासकीय अधिकारी उपस्थित होते. चव्हाण यांनी या वेळी पालखीस्थळांच्या गावांचे सरपंच, तलाठी व ग्रामसेवक यांच्याकडून अडीअडचणीसंदर्भात चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यावर उपाययोजनांसाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना ताबडतोब कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. वारकऱ्यांसाठी प्राधान्याने पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना व पर्यायी व्यवस्था करण्यासंदर्भात चर्चा केली. पालखी मुक्काम स्थळांवर सीसीटीव्ही बसवण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या. प्रशासकीय यंत्रणेने समन्वयाच्या माध्यमातून सतर्क राहावे. पालखी मार्गावरील रस्त्यांची डागडुजी करून वाहतूक व्यवस्थेकडेही लक्ष देण्याच्या सूचना चव्हाण यांनी या वेळी दिल्या. महावितरण विभागाला विद्युत पुरवठ्याकडे लक्ष देण्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.