लोकसाहित्य हे मराठी मनाचे उत्कट भावदर्शन
By Admin | Updated: November 30, 2015 01:45 IST2015-11-30T01:45:21+5:302015-11-30T01:45:21+5:30
संतसाहित्य हे ज्ञानाचे आणि लोकसाहित्य हे मराठी मनाचे उत्कट भावदर्शन आहे. साहित्य हे समाजमनाचा आरसा आहे.

लोकसाहित्य हे मराठी मनाचे उत्कट भावदर्शन
पिंपरी : संतसाहित्य हे ज्ञानाचे आणि लोकसाहित्य हे मराठी मनाचे उत्कट भावदर्शन आहे. साहित्य हे समाजमनाचा आरसा आहे. समाजात जे जे काही घडते ते साहित्यातून अभिव्यक्त होत असते. तो आरसा नितळ असावा, असे मत संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले.
२४ वे विभागीय साहित्य संमेलन भोसरी येथे १ व २ डिसेंबरला होत आहे. त्या निमित्ताने संमेलनाध्यक्ष देखणे यांची प्रकट मुलाखत घेतली. कीर्तनकार, प्रवचनकार, चिंतनशील वक्ते, तत्त्वज्ञ, बहुरूपी, भारुडाचे प्रयोग करणारे भारुडकार, लोकसाहित्य, लोककला, संत साहित्याचे गाढे अभ्यासक अशा अनेक भूमिका वठविणारे व्यक्तिमत्व म्हणजेच डॉ. रामचंद्र देखणे होत. संतवाङ्मय, लेखन, संशोधन आणि आविष्कार असे योगदान त्यांनी दिले आहे. साहित्याविषयीची त्यांची भूमिका, सध्याचे सहिष्णूतेच्या नावावर पिटला जाणारा डांगोरा, मराठी भाषेच्या संवर्धन विकासाविषयी केलेली चिंता, साहित्य संमेलन अध्यक्षपदाची निवडणूक पद्धती यावर भाष्य केले.
संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आपली भावना काय?
संतसाहित्य, ललित, लोककला, लोकजीवन, सांस्कृतिक, वैचारिक, प्रबोधनात्मक, चिंतनशील परंपरेचा हा गौरव आहे. पस्तीस वर्षांच्या सेवेचा हा बहुमान आहे. एकीकडे संतसाहित्याचा प्रभाव, ज्ञानोबा-तुकोबा आणि दुसरीकडे श्रमिकांची भूमी असे या भूमीस महत्त्व आहे. संत आणि श्रमसंस्कृती अशा दोन संस्कृतींच्या काठावरती मी उभा आहे.
मागे वळून पाहताना काय वाटते?
१९७२ च्या दुष्काळाच्या कालखंडात मी पुण्यात शिकायला होतो. त्या वेळी डब्याबरोबरच विदारक अशा दुष्काळाबाबत माहिती देणारी पत्रे घरातून येत असत. दुष्काळ एवढा भयानक होता की, जीवदया मंडळात आपली गुरे-ढोरे देण्यापलीकडे पर्याय उरला नव्हता. वडिलांनी आपली गुरे तालुक्याच्या गावात नेऊन सोडली. वडील घरी आले. मात्र, त्यांना झोप लागली नाही. पहाटे तीनच्या सुमारास कोणीतरी घराच्या दारावर थाप दिल्यासारखे झाले. दरवाजा उघडला, तर आमची गाय समोर उभी होती. अकरा किलोमीटर चालून ती घरी आली होती. दुष्काळात मी काय जड झाले की काय, असा प्रश्न ती आमच्या कुटुंबाला करीत असावी. याच जाणिवेतून पहिली कथा जन्माला आली. तिचे नाव म्हणजे जित्राब. पुढे लिहायला लागलो. ग्रामीण जीवन, बोधकथा, गुराख्यांचे जीवन, अज्ञात शिवराचा शोध , हरवलेले गावपण यावर कथा लिहल्या.
ललित आणि संतसाहित्य असा वारसा घरात होता. त्यामुळे गुरे वळण्याबरोबरच औतकाठी करणे, गावजत्रात सहभागी होणे, लळितात भाग घेणे, जत्रेच्या तमाशात गण सादर करणे असे समृद्ध ग्रामीण जीवन अनुभवले.
लोककलेतील कलाकार किंवा मौखिक साहित्य परंपरेला साहित्याचा किंवा साहित्यिकांचा दर्जा मिळालेला नाही. संतसाहित्य हे ज्ञानाचे आणि लोकसाहित्य हे मराठी मनाचे उत्कट भावदर्शन आहे. संत आणि लोकसाहित्यांची सेवा करता आली ही गोष्ट मी भाग्याची समजतो. ज्याने वैश्विक जाणिवा दिल्या, तो संत साहित्याचा प्रवाह आहे.
सामाजिक असहिष्णूतेचा डांगोरा पिटणे योग्य वाटते का?
विवेकाची दृष्टी देणारा साहित्यिक असतो. जगातील सर्वांगसुंदर साहित्य हे वेदनेतून जन्माला आले. वेदना, संवेदना, सहवेदना ही साहित्यनिर्मितीच्या घरातील भावंडे आहेत. सामूहिक जीवन जगण्यासाठी जरी आवश्यक असणाऱ्या जीवनमूल्यांना जागविणे हे साहित्याचे प्रयोजन असले, तरी सामाजिक सहिष्णूता टिकविणे हेही साहित्याचे प्रयोजनच आहे. त्यामुळे साहित्यिक हा सहिष्णूता टिकविणारा घटक आहे, विघटन करणारा किंवा असहिष्णूता वाढविणारा नव्हे. दुभंगलेल्यांना अभंग करण्याचे काम साहित्याने केले आहे. साहित्यिकांनी अतिरेक करणे टाळावे.
भाषा संवर्धनासाठी प्रयत्न होताहेत का?
साहित्य हे मनोरंजन आणि प्रबोधनासाठी निर्माण झालेले आहे. सर्वत्र मराठीचा वापर व्हायला हवा. भाषा टिकली, तर संस्कृती टिकणार आहे. संवर्धनाची जबाबदारी सर्वांचीच आहे. नाणेघाटात सापडलेल्या शिलालेखावरून २२०० वर्षांपासून मराठी भाषा अस्तित्वात असल्याची माहिती समोर आली आहे. बारा कोटी लोक मराठी भाषा बोलतात. त्यामुळे त्या भाषेला अभिजात दर्जा का मिळू नये? साहित्य संमेलन हे साहित्य विश्वाचा प्रमुख सोहळा आहे. त्या सोहळ्याच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया नसावी.
(प्रतिनिधी)