पुणे: ‘लोकमत’चे रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असलेले आकर्षक प्रवेशद्वार... तुतारीचा निनाद... हिरवळीचा साज आणि हजारो दीपमाळांनी उजळून निघालेली ‘लोकमत’ची वास्तू...अशा अतिशय आनंददायी अन् स्नेहमय वातावरणात ‘लोकमत’ने राैप्यमहाेत्सवी वर्धापनदिन साजरा केला. या घटनेचे साक्षीदार हाेत शनिवारी (दि. २८) हजाराे पुणेकर वाचकांनी ‘लाेकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव केला. विविध क्षेत्रांतील दिग्गज व्यक्तींनी आवर्जून उपस्थिती लावत ‘लोकमत’ला शुभेच्छा दिल्या.
गेल्या २५ वर्षांपासून पुण्यात ‘लोकमत’ची दमदार वाटचाल सुरू आहे. अनेक वर्षांपासून पुण्याचे नंबर-१ दैनिक असलेल्या ‘लोकमत’वर पुण्यातील मान्यवरांच्या मांदियाळीत शुभेच्छांचा वर्षाव झाला. लोकमतचे संपादक संजय आवटे आणि सहायक उपाध्यक्ष निनाद देसाई यांनी सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. यावेळी सामान्य वाचकांपासून ते राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक, अशा विविध क्षेत्रांतील कर्तृत्वसंपन्न, दिग्गज मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच अनेकांनी दूरध्वनीवरूनही शुभेच्छा दिल्या.
सिंहगडरोडवरील लोकमत भवन शनिवारी मान्यवरांच्या मांदियाळीने अगदी फुलून गेले होते. स्नेहीजनांच्या या मेळाव्यात उपस्थित मान्यवर विविध विषयांवर गप्पांमध्ये रंगले होते. सोबतीला काॅफी अन् स्नॅक्सच्या मेजवानीचा आस्वाद सर्वांनी घेतला.
‘लोकमत’चे रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण असे लिहिलेल्या फलकासमोर प्रत्येकजण सेल्फी काढत होता. सायंकाळी ५ वाजता वाचकांनी येऊन शुभेच्छा द्यायला सुरुवात केली. शुभेच्छा देण्यासाठी वाचक अन् मान्यवरांनी गर्दी केली. ‘लोकमत भवन’ गर्दीने फुलून गेला होता. रात्री ९ नंतरही वाचकांनी आवर्जून हजेरी लावत ‘लोकमत’वरचे प्रेम दाखवून दिले. ‘लोकमत’चा रौप्यमहोत्सव अतिशय दिमाखात साजरा झाला.
गप्पांची मैफल रंगल्या
‘लोकमत’च्या वर्धापनदिनाला अनेक मान्यवर आले. त्यातील बरेचजण कॉफीचा आस्वाद घेताना एकमेकांशी गप्पा मारत होते. त्यामुळे सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या गप्पांच्या मैफली रंगल्या.
मान्यवरांची मांदियाळी
केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, विधानपरिषदेच्या उपसभापती, खासदार, आमदार, माजी नगरसेवक, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, सामान्य वाचक आदी ‘लोकमत’च्या वर्धापनदिन रौप्यमहोत्सवी सोहळ्यात सहभागी झाले होते.
सेल्फी विथ ‘लोकमत’
‘लोकमत भवन’मध्ये प्रवेशद्वारावरच भव्यदिव्य अशी रौप्यमहोत्सवी वर्षाची आकर्षक रचना साकारली होती. त्या ठिकाणी बऱ्यांचजणांनी सेल्फी काढले. तसेच आत प्रवेश केल्यानंतर खास सेल्फी पॉइंट बनवला होता. तिथेही आवर्जुन प्रत्येकजण सेल्फी काढून घेत होता.