-हिरा सरवदेपुणे : महापालिकेच्या समाज विकास विभागाकडून चौदा लाख रुपये खर्च करून अभिरूची परिसरातील भिडे उद्यानात उभारलेल्या दिव्यांगांच्या स्वच्छतागृहाचे काम निकृष्ट दर्जाचे व ओबड-धोबड पद्धतीचे वृत्त लोकमतने नुकतेच प्रसिद्ध केले. या वृत्तानंतर काम करणारा ठेकेदार ताळ्यावर आला असून त्यांने रंग दिलेल्या भिंतीवर पुन्हा प्लास्टर व स्टाइल फरशी बसवली आहे.
महापालिकेच्या घनकचरा व व्यवस्थापन विभागाकडून विविध शहरात ठिकाणी स्वच्छतागृहांची उभारणी केली जाते. तसेच या स्वच्छतागृहांची दैनंदिन स्वच्छता ठेकेदारामार्फत केली जाते. मात्र, शहरात दिव्यांगांसाठी पुरेशी स्वच्छतागृहांची व्यवस्था नसल्याने समाज विकास विभागाने शहरात सहा ठिकाणी दिव्यांगांसाठी स्वच्छतागृहे बांधण्याचे काम हाती घेतले आहे. यातील एक स्वच्छतागृह सिंहगड रस्त्यावरील अभिरूची परिसरातील भिडे उद्यानात बांधण्यात आले आहे. या स्वच्छतागृहासाठी १६ लाख तरतूद असून १४ लाखांमध्ये ठेकेदाराला काम देण्यात आले आहे. मात्र, ठेकेदाराने या स्वच्छतागृहाचे काम ओबडधोबड व कामचलाई पद्धतीने केल्याचे निदर्शनास येते.
स्वच्छतागृहाच्या भिंतींना व दरवाजांना ओबडधोबड पद्धतीने प्लास्टर करून भिंतीला रंग देऊन त्यावर चित्र काढली आहेत. भिंतीच्या फटी प्लास्टरच्या माध्यमातून योग्य प्रकारे बुजविण्यात आलेल्या नव्हत्या. तसेच रॅम्पची फरशी जेथे संपते तेथे सिमेंटचे प्रमाण कमी वापरल्यामुळे त्याची माती झाली आहे. हे स्वच्छतागृह दिव्यांगांसाठी असतानाही रॅम्पची उंची कमी ठेवण्यात आली होती. समोरील बाजूने फरशी बसवूनही अनेक ठिकाणी फटी होत्या. पाठीमागील बाजूस ओबडधोबड काम केले आहे. त्यावरच पांढरा रंग देण्यात आलेला आहे. अशा प्रकारे कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे वृत्त लोकमतने छापले होते. दरम्यान, स्वच्छतागृहाच्या आतील कामाचा दर्जा त्याचे दरवाजे उघडल्यानंतरच समजणार आहे.
या वृत्ताची दखल घेऊन समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास यांनी संबंधित ठेकेदाराने कामाचा दर्जा सुधारणा केली नाही, तर बिल दिले जाणार नाही. तसेच त्याची अनामत रक्कम जप्त करून त्याला एक वर्षासाठी काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला होता.
यानंतर ताळ्यावर आलेल्या ठेकेदाराने स्वच्छतागृहाच्या दरवाजांच्या चौकटींच्या फटी बुजविण्यासाठी रंगावरून पुन्हा प्लास्टर केले आहे. दरवाजाच्या खालील बाजूस खराब प्लास्टर लपवण्यासाठी स्टाइल्सच्या फरशा लावल्या आहेत. तसेच समोरील कट्टयावर पूर्वी केलेल्या फरशीवर पुन्हा नव्याने फरशी बसविण्यात आली आहे. याशिवाय दोन्ही बाजूंच्या रॅम्पची उंची वाढवून दिव्यांगांना थेट स्वच्छतागृहात जाता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.