नाझरे जलाशय परिसर झाला चकाचक
By Admin | Updated: October 3, 2015 01:32 IST2015-10-03T01:32:11+5:302015-10-03T01:32:11+5:30
महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून जेजुरी जयाद्री मित्रपरिवार, मल्हार निसर्गसंवर्धन संघटना, जेजुरी नगरपालिका व द सावली फाउंडेशन यांच्या वतीने नाझरे

नाझरे जलाशय परिसर झाला चकाचक
जेजुरी : महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून जेजुरी जयाद्री मित्रपरिवार, मल्हार निसर्गसंवर्धन संघटना, जेजुरी नगरपालिका व द सावली फाउंडेशन यांच्या वतीने नाझरे धरण कॉलनी परिसरातील जलाशयाचा किनारा स्वच्छ करण्याचे अभियान राबविण्यात आले.
पंधरा दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे कऱ्हा नदी वाहू लागली, मल्हारसागर (नाझरे धरण) जलाशयात सुमारे पन्नास टक्के पाणीसाठा झाला. श्री गणेश विसर्जनावेळी जेजुरी शहरातील होळकर तलावात पुरेसे पाणी नसल्याने जेजुरीकरांनी तसेच अनेक सार्वजनिक मंडळांनी नाझरे धरणात श्री गणेशाचे विसर्जन केले. या वेळी मोठ्या प्रमाणात निर्माल्यही पाण्यात टाकण्यात आले होते. तसेच या परिसरात रोज देवकार्यही होत असल्याने हार, फुले नैवेद्य, प्लॅस्टिक कागद, देवांचे फोटो, कपडे आदींचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे कॉलनी परिसरातील कऱ्हा नदीच्या काठावर सर्वत्र कचऱ्याचे प्रमाण वाढून पाणी दूषित होऊ लागले होते. या अभियानात जेजुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा ज्ञानेश्वरी बारभाई, नगरसेविका साधना दीडभाई, जयाद्री व मल्हार निसर्गसंवर्धन संस्थेचे कुमार पवार, गणेश टाक, विजयकुमार हरिचंद्रे, राहुल मंघनानी, आयुब खान, तनाज पानसरे, प्रशांत नाझीरकर, अतुल आगलावे, विलास कड नितीन राऊत, भाऊसाहेब देशमुख, विशाल बारभाई, आशा बारभाई, संगीता राऊत, सचिन झगडे, वासंती पवार, तसेच द सावली फाउंडेशनचे सायली धनाबाई, उमेश कुदळे, डॉ. तृप्ती भोईटे, प्रमोद शेंडकर, श्रीकृष्ण ढोले; तसेच नगरपालिकेचे स्वच्छता विभागाचे कर्मचारी, आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. नगराध्यक्षा ज्ञानेश्वरी बारभाई यांनी आभार मानले. कऱ्हा नदीवर दरवर्षी जयाद्री परिवारच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येतो. (वार्ताहर)