स्थानिक मजुरांना बिहारमधील मजुरांचा पर्याय
By Admin | Updated: October 5, 2015 01:16 IST2015-10-05T01:16:34+5:302015-10-05T01:16:34+5:30
इंदापूर तालुक्यात द्राक्षबागांच्या कामासाठी स्थानिक मजुरांच्या तुटवड्यावर बिहारी मजुरांचा द्राक्षबागायतदारांनी पर्याय शोधला आहे.

स्थानिक मजुरांना बिहारमधील मजुरांचा पर्याय
बारामती : इंदापूर तालुक्यात द्राक्षबागांच्या कामासाठी स्थानिक मजुरांच्या तुटवड्यावर बिहारी मजुरांचा द्राक्षबागायतदारांनी पर्याय शोधला आहे. गेल्या पाच वर्षांपासून द्राक्षबागांमध्ये बिहारी मजुरांचा पर्याय सक्षम ठरला आहे. सध्या तालुक्यात हे प्रमाण वाढले आहे. तालुक्यात
२ हजारांहून अधिक बिहारी वास्तव्यास आले आहेत. सध्या द्राक्षांच्या छाटण्या सुरू आहेत. आधुनिक यंत्रणा, परप्रांतीय मजुरांचा पर्याय, शेततळ्यांच्या माध्यमातून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून द्राक्षबागायतदारांचे जीवनमान बदलले आहे.
इंदापूर तालुक्यात बोरी, काझड, शिंदेवाडी, शेळगाव, भरणेवाडी, कळस, अंथुर्णे आदी भागात द्राक्षबागा आहेत. या बागांमध्ये छाटणीपूर्व मशागतीपासून द्राक्ष परिपक्व होईपर्यंत बिहारी मजुरांना काम दिले जात आहे. या एकूण कामासाठी मजुरांकडून सध्या २५ ते ३५ हजार रुपये एकरी घेतले जातात. ६० ते ७० दिवसांच्या या कालावधीत बिहारी मजूर बागांमध्ये थांबून ही कामे करताना दिसतात. (प्रतिनिधी)