मंचर : प्रथमच स्थापन झालेल्या मंचर नगरपंचायतीची निवडणूक चुरशीची बनली आहे. प्रचारासाठी राज्याचे दोन उपमुख्यमंत्री आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत होत असून, प्रत्येक प्रभागात तिरंगी, चौरंगी, पंचरंगी लढती होत आहे. अपक्ष उमेदवारसुद्धा कडवी झुंज देत असून, त्यांच्यामुळे अनपेक्षित निकालाची शक्यता वाढली आहे.
मंचर नगरपंचायतीच्या १७ प्रभागांपैकी प्रभाग १ बिनविरोध निवडला गेला आहे. उर्वरित १६ प्रभागांत चुरशीच्या लढती होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप युती करून निवडणूक लढवत असून, शिवसेना शिंदे गटाने स्वबळावर पॅनेल उभे केले आहे. उद्धवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोबत घेऊन नगराध्यक्षासह १२ ठिकाणी तर काँग्रेसने आप पक्षाला सोबत घेऊन नगराध्यक्ष व ७ ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. शहराचा प्रथम नगराध्यक्ष व प्रथम नगरसेवक होण्यासाठी सर्वच उमेदवारांनी जोर लावला आहे.नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, काँग्रेस यांच्यामध्ये लढत होत असतानाच अपक्ष उमेदवारांनी रंगत निर्माण केली आहे. १६ प्रभागांमध्ये तिरंगी, चौरंगी, पंचरंगी लढत होत असल्याचे दिसते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये बंडखोरी होऊन काही जण अपक्ष लढत आहेत. त्यांनीही प्रचारात कुठलीही कसर सोडलेली नाही. शिंदेसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धवसेना यांच्या जाहीर प्रचार सभा झाल्या आहेत. त्यातही एकाच दिवशी राज्याचे दोन उपमुख्यमंत्री प्रचारासाठी आले होते. त्यांनी जाहीर सभा घेऊन शहराच्या विकासाचे रोल मॉडेल मांडले. या सभांमध्ये शक्तिप्रदर्शन करण्यात आले. त्यामुळे वातावरण निर्मिती झाली आहे. प्रचारासाठी एक दिवस जास्त मिळाला आहे.
त्याचे नियोजन सर्वच पक्ष करत असून शेवटच्या दिवशी शक्तिप्रदर्शन केले जाईल. शहरातील काही प्रभागांत मतदारांची संख्या जास्त तर काही ठिकाणी कमी आहे. उमेदवार घर टू घर प्रचार करताना दिसतात. एका मतदाराला चार ते पाच वेळा भेटून मतदान करण्याचे आवाहन केले जाते. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी कमी होऊन विकास कामासंदर्भात मुद्दे मांडले जात आहे. अपक्ष उमेदवार प्रचारात कुठेही कमी नाही. नगराध्यक्षपदाच्या दोन्ही अपक्ष उमेदवारांचा जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. तर प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार शहरात तसेच वाडी वस्तीवर रॅली काढून मतदारांशी संपर्क साधत आहेत. प्रचारात महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. तरुणही हिरिरीने भाग घेत आहेत. शहरातील वातावरण निवडणूकमय झाले आहे.
बंडखोरीचा फटका कोणाला बसणार?
प्रभाग १० व ११ हे सर्वसाधारण असून, तेथे चुरशीची लढत होत आहे. प्रभाग ७,१०,१४ मध्ये राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार उभे असून त्याचा फटका कोणाला बसणार हे निकालात दिसेल. शिवसेना व भाजप पक्षातही बंडखोरी झाली असून दोन्ही पक्षांचे बंडखोर उमेदवार नगराध्यक्षपदासाठी अपक्ष म्हणून रिंगणात आहे. भाजपाने बंडखोरी केलेल्या आठ जणांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष, अपक्ष नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या तीन उमेदवारांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी, भाजपा युती व शिंदेसेना एकमेकांविरोधात
राज्यात सत्तेत एकत्र असतानाही राष्ट्रवादी, भाजपा युती व शिंदेसेना एकमेकांविरोधात लढत आहेत. यापूर्वी जी विकासकामे झाली, ती आपणच केल्याचा दावा सर्व पक्ष करतायेत. मात्र, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याचे टाळले आहे. दोन उपमुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभेतही फारशी टीका झाली नाही. मंचर शहरात मुस्लिम मतदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे दोन्ही पॅनेलमध्ये मुस्लिम उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. पुढील दोन दिवस प्रचाराच्या धामधुमीचे असणार आहे.
Web Summary : Manchar Nagar Panchayat election intensifies with NCP-BJP alliance, Shinde Sena contesting separately. Multi-cornered fights and rebel candidates add unpredictability. Two Deputy Chief Ministers campaigned, promising development. Focus remains on voter outreach and development agendas.
Web Summary : मंचर नगर पंचायत चुनाव में एनसीपी-भाजपा गठबंधन, शिंदे सेना अलग से चुनाव लड़ रही है। बहुकोणीय मुकाबले और बागी उम्मीदवार अप्रत्याशितता जोड़ते हैं। दो उपमुख्यमंत्रियों ने प्रचार किया, विकास का वादा किया। मतदाता संपर्क और विकास एजेंडा पर ध्यान केंद्रित है।