साहित्य संमेलन यशस्वी करावे
By Admin | Updated: August 22, 2015 02:07 IST2015-08-22T02:07:55+5:302015-08-22T02:07:55+5:30
पिंपरी-चिंचवडमध्ये होणाऱ्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात स्थानिकांना सहभागी करून घ्यावे. स्थानिक साहित्यिक, साहित्य रसिकांनी संमेलन

साहित्य संमेलन यशस्वी करावे
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये होणाऱ्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात स्थानिकांना सहभागी करून घ्यावे. स्थानिक साहित्यिक, साहित्य रसिकांनी संमेलन यशस्वी करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आयोजित साहित्यिक मेळाव्यात करण्यात आले.
रस्टन कॉलनी (प्राधिकरण) येथे गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात साहित्यिक व विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. साहित्यिक, रसिक आणि अपेक्षित कार्यक्रमांची यादी तयार करण्यात आली.
नवयुगचे अध्यक्ष राज अहेरराव म्हणाले, ‘‘शहरात साहित्य संमेलन भरत आहे, याचा साहित्यिक, रसिकांना अभिमान वाटतो. हे संमेलन ऐतिहासिक संमेलन ठरावे म्हणून आमची भूमिका पार पाडू. स्थानिक साहित्यिकांनी एकत्र येऊन घरच्या या सोहळ्यास हातभार लावावा.’’
साहित्य मंचचे राजेंद्र घावटे म्हणाले, ‘‘दुष्काळाच्या सावटात हे संमेलन होत आहे, याची जाणीव ठेवून संमेलन साध्या पद्धतीने व्हावे. स्थानिकांना विश्वासात घेऊन संमेलन व्हावे. ही संतांची भूमी आहे. त्यामुळे हे संमेलन आदर्श संमेलन ठरावे.’’
साहित्य संवर्धन समितीचे अध्यक्ष सुरेश कंक म्हणाले, ‘‘प्रत्येकाला त्यांच्या पात्रतेप्रमाणे सहभागी करून घ्यावे. संयोजकांनी स्थानिकांचा एक मेळावा आयोजित करावा.’’ पिंपरी-चिंचवड मनपाचे सदस्य गोरक्ष लोखंडे म्हणाले, ‘‘महापालिकेतर्फे स्थानिकांसाठी निश्चित प्रयत्न करू. मनपाने जे सांस्कृतिक धोरण स्वीकारले आहे, त्याचे चांगले पडसाद उमटत आहेत.’’
या वेळी नंदकुमार मुरडे, अशोक कोठारी, नितीन यादव, सुहास घुमरे, वर्षा बालगोपाल, सविता इंगळे, सुभाष चव्हाण, डॉ. सोमनाथ सलगर, प्रदीप गांधलीकर, शोभा जोशी, बशीर मुजावर आदींनी मनोगत व्यक्त केले. मंगेश पोहणेकर, अनिकेत गुहे,
अॅड. अंतरा देशपांडे यांनी संयोजन केले.
स्थानिक साहित्यिक, कार्यकर्ते, माध्यम प्रतिनिधींना संयोजनात समाविष्ट करावे, मंडप आणि द्वाराला संतांची नावे द्यावीत, डॉ. डी.
वाय. पाटील यांच्या नावाला साजेसे उपक्रम व व्यवस्थापन व्हावे, अध्यक्ष निवड प्रक्रिया वादविरहित व्हावी, स्थानिकांना २५ मतांचा अधिकार मिळावा, भोजन साधे व शाकाहारीच असावे, दर कमीत कमी ठेवावा,
चहा-पाणी, निवास, सर्वसामान्यांना अल्पदरात करून द्यावी, रसिकांनाही सन्मानाची वागणूक मिळावी, स्थानिक मंडळांना सामावून
घ्यावे, विविध संस्था मंडळातील कार्यकर्त्यांची बैठक संयोजन
समितीने घ्यावी, वक्तृत्व स्पर्धा, अभिवाचन आदी साहित्यप्रकार घ्यावेत.
दरम्यान, हे साहित्य संमेलन भरविण्याचा मान पिंपरी-चिंचवडला मिळाल्याबद्दल साहित्यिकांना
आनंद झाला. या काळात साहित्याची परवणी मिळणार आहे. तसेच नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन मिळणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)