श्रवणीय गायन, विलोभनीय नृत्य

By Admin | Updated: December 26, 2016 02:58 IST2016-12-26T02:58:28+5:302016-12-26T02:58:28+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित अठराव्या स्वरसागर महोत्सवात समारोपाच्या दिवशी शनिवारी ‘कट्यार काळजात घुसली’फेम गायक महेश काळे

Listening singing, rhythmic dance | श्रवणीय गायन, विलोभनीय नृत्य

श्रवणीय गायन, विलोभनीय नृत्य

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित अठराव्या स्वरसागर महोत्सवात समारोपाच्या दिवशी शनिवारी ‘कट्यार काळजात घुसली’फेम गायक महेश काळे यांचे सुश्राव्य गायन, ज्येष्ठ कथक नर्तक पं. राजेंद्र गंगाणी यांचे विलोभनीय नृत्य, पायल गोखले यांची कथक नृत्य प्रस्तुती तसेच स्थानिक कलाकारांचा कार्यक्रम झाला.
पहिल्या सत्रात पायल गोखले यांनी कथक नृत्य सादर केले. त्यांनी यावेळी दुर्गास्तुतीने कार्यक्रमाची सुरुवात केली. गजझंपा ही तालप्रस्तुती केली. थाट, आमद, गिनती, तिहाई यांच्या माध्यमातून त्यांनी कथक नृत्याची खासियत उलगडून दाखवली. त्यानंतर सीताहरण, जटायूवध ही रचना अभिनयातून रसिकांसमोर हुबेहुब मांडली. त्यांना संवादिनीची साथ राजीव तांबे यांनी केली. तबला साथ मंगेश करमरकर यांनी पंडित मानसी भागवत यांनी व गायनसाथ अंकिता तांबे यांनी केली.
नंतरच्या सत्रात जयपूर घराण्याचे नर्तक पं. राजेंद्र गंगाणी यांचे विलोभनीय कथक नृत्य सादर झाले. त्यांनी नृत्याची सुरुवात बाजे डमरु बाजे या शिवस्तुतीने केली. तीनतालातील रचना सादर करताना थाट, आमद, परणचे सौंदर्य उलगडून दाखवले. पाण्यातून चालणा-या नावेची गती, तिचे हेलकावे त्यांनी आपल्या नृत्यातून सादर केले. गुरुबिन ऐसे कौन करे हे सूरदासांचे भजन सादर केले. त्यांनी आपल्या नृत्याचा समारोप तबल्याच्या साथीने बहारदार जुगलबंदी करुन केला. तबल्यातून निघणारे बोल आणि त्या तालावर झंकारणारे घुंगरु यांचा अपूर्व संगम यावेळी रसिकांनी अनुभवला. कधी हे घुंगरु खणखणत होते तर कधी नाजूकपणे किणकिण करीत होते. तर कधी एक घुंगरु त्याची वेगळीच भाषा बोलत होता. नृत्यातील लय, त्याची तालाशी चाललेली स्पर्धा यांनी रंगतदार बनलेल्या या जुगलबंदीला सतारीच्या मधुर स्वरांची देखील समर्पक साथ होती. एका क्षणी समेवर आलेली ही मैफल संपूच नये असेच वाटत होते. पं. गंगाणी यांना तबला साथ पं. कालिनाथ मिश्रा यांनी, संवादिनी व गायन साथ सोमनाथ मिश्रा यांनी, सतारीची साथ भूपाल पणशीकर यांनी केली.
स्वरसागर महोत्सवाच्या शेवटच्या सत्रात युवा गायक महेश काळे यांचे श्रवणीय गायन झाले. काळे यांनी आपल्या गायनाची सुरुवात भूप रागातील महादेव महेश्वरा या बंदिशीने केली. त्याच बंदिशीला सूर निरागस हो या सध्याच्या लोकप्रिय प्रार्थनेत रुपांतरित करुन उपस्थित रसिकांना मोरयाच्या गजरात सामिल करुन घेतले. त्यानंतर त्यांचे गुरु पं. जितेंद्र अभिषेकी यांना स्वरांजली वाहताना अभिषेकीबुवांच्या अनेक रचनांची गीतश्रृंखला तयार करुन उपस्थितांना स्वरसागरात डुंबायला लावले. अरे नाखवा या लोकगीतापासून सुरु झालेली ही गीतश्रृंखला हा नाद सुगंध, राया अशी जवळ मला घ्याल का? तपत्या झळा उन्हाच्या, मुझको है नाज तुझपर, नाजूकसी कलाई हो जिसकी वो तीर चलाना क्या जाने? सोडरे श्रीहरा शालूच्या पदरा, लागी कलेजवा कटार, मन हरपले, शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले, निगाह रख्खो हुश्शार, बाली उमरिया मोरी या सारख्या लावणी, भावगीत, टप्पा, ठुमरी, कव्वाली, अभंग यांचे वैविध्य उलगडून दाखवून गेली.
सर्व कलाकारांचा सत्कार झाला. माजी महापौर आर. एस. कुमार, माजी उपमहापौर राजू मिसाळ, नगरसेविका भारती फरांदे, वैशाली काळभोर, नंदा ताकवणे, प्रतिभा भालेराव, मुख्य संयोजक प्रवीण तुपे, सहसंयोजक संजय कांबळे, सुरेखा कुलकर्णी, मानद सल्लागार नंदकिशोर कपोते आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Listening singing, rhythmic dance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.