साहित्य प्रवाह बदलता हवा

By Admin | Updated: January 16, 2016 02:45 IST2016-01-16T02:45:40+5:302016-01-16T02:45:40+5:30

‘‘बदलत्या काळाप्रमाणे साहित्य प्रवाही असावे, अन्यथा ते समाजाबाहेर फेकले जाते आहे. मराठी साहित्याचा प्रवाह बदलता हवा,’’ असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे

Lightening the material flow | साहित्य प्रवाह बदलता हवा

साहित्य प्रवाह बदलता हवा

- विश्वास मोरे/मंगेश पांडे,  ज्ञानोबा-तुकोबानगरी, पिंपरी

‘‘बदलत्या काळाप्रमाणे साहित्य प्रवाही असावे, अन्यथा ते समाजाबाहेर फेकले जाते आहे. मराठी साहित्याचा प्रवाह बदलता हवा,’’ असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शुक्रवारी व्यक्त केले. गेल्या ८८ वर्षांत आणि पुढील २५ वर्षांत होणार नाही, असा ‘न भूतो न भविष्यती’ असा हा सोहळा आहे, असे गौरवोद्गार काढले.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि विश्वसाहित्य संमेलनांच्या माजी अध्यक्षाचा सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, कार्यवाह प्रकाश पायगुडे, उपाध्यक्ष डॉ. भालचंद्र शिंदे, कोषाध्यक्ष सुनील महाजन, खासदार अमर साबळे, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, माजी आमदार उल्हास पवार, ज्ञानेश्वर मुळे, भाग्यश्री पाटील, श्रीनिवास ठाणेदार आदी उपस्थित होते. या वेळी माजी संमेलनाध्यक्ष मधु मंगेश कर्णिक, डॉ. यू. म. पठाण, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. द. भि. कुलकर्णी, फ. मुं. शिंदे, ८८व्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, ८९व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस, विश्वसाहित्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाधर पानतावणे, शेषराव मोरे यांचा सत्कार झाला.
शिंदे म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड शहर ही औद्योगिकनगरी आहे. येथे लक्ष्मी निर्माण होते. संमेलनाच्या माध्यमातून पी. डी. पाटील यांनी या सरस्वतीस आणले आहे. संमेलन भव्यच भव्य आहे. आज विविध साहित्य आहेत. पण प्रवाह बदलत चालला आहे. समाज बदलत आहे. या बदलत्या प्रवाहाला नवीन साहित्याची गरज आहे.’’
डॉ. पानतावणे म्हणाले, ‘‘वाचक आहे म्हणून साहित्यिक आहेत आणि संमेलन आहे. यामुळे साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर वाचकांनाही व्यक्त होण्याची संधी मिळायला हवी, जेणेकरून त्यांना काय हवे, काय आवडते, याची जाणीव साहित्यिकांना होईल.’’
मधू मंगेश कर्णिक म्हणाले, ‘‘साहित्य संमेलनाची फलश्रुती काय?, असा नेहमीच प्रश्न विचारला जातो. तसेच, संमेलनाध्यक्ष म्हणजे दीड दिवसाचा गणपती असे बोलले जाते. मात्र, वस्तुस्थिती तशी नाही. माझ्या कालावधीत मी आद्यकवी केशवसुत यांचे मालगुंड येथे भव्य स्मारक उभारले.’’
डॉ. द. भि. कुलकर्णी म्हणाले, ‘‘सत्ता आणि साहित्याचे नाते विरोधाचे नाही, तर प्रियकर-प्रियसीचे असते. सत्ताकारण समकालीन, तर साहित्य अस्थायीकाल असते.
मात्र, सत्ता आणि साहित्यात उचित अंतर असणे कधीही चांगले ठरते. रवींद्रनाथ टागोरांचा आदर्श मराठी साहित्यिकांनी घेतला, तर मराठीलाही नोबेल मिळू शकते. ’’
या वेळी द. भिंनी ‘इतुके
आले जवळ की, जवळपणाचे झाले ओझे’ ही रचना सादर केली. ते म्हणाले की, रविशंकर, रविंद्रनाथ टागोर या कलावंतांनी त्याग
केला. तपश्चर्या केली. याही गोष्टी पाहायला हव्यात.’’
फ. मुं. शिंदे म्हणाले, ‘‘आपण स्वच्छंदी राहतो, मात्र आपल्या कविता दु:खाच्या लिहितो. त्यामुळे आपणाला अनेक जण विचारतात, तुम्ही दु:खाच्या कविता कशा लिहिता? काही जण तर म्हणतात, या कविता तुमची बायको लिहीत असेल. मात्र, तसे काही नाही.’’ या वेळी त्यांनी ‘कधीही असे घडले नाही, जिथं दु:ख भेटले
नाही, स्वप्न असेही पडले नाही तिथे दु:ख भेटले नाही मी गोसावी का हो? सुखे जगतो फिरतो आहे. दार असे सापडले नाही जिथे सुख भेटले नाही.’ ही कविता सादर केली. उपस्थितांची दाद घेतली.
पवार म्हणाले, ‘‘ज्ञानोबा-तुकोबांच्या संगतीत मातृभाषेची परंपरा जपणारे हे संमेलन आहे.’’ सबनीस म्हणाले, ‘‘वेगवेगळ्या प्रवाहांना बरोबर घेऊन पहिल्यांदाच अशा प्रकारचा सोहळा होत
आहे. भव्यता आणि दीव्यता सिद्ध करणारे संमेलन आहे.’’ ठाणेदार म्हणाले, ‘‘अमेरिकेतही अशा
प्रकारचे संमेलन झाले नाही. या संमेलनाचा आदर्श घेऊन आम्ही संमेलन भरवू.’’
कोत्तापल्ले म्हणाले, ‘‘संमेलन आयोजित करणारे लोक कधी निमंत्रणेही देत नाहीत. मात्र, यंदा विद्यमान आणि माजी संमेलनाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला, असे कधीही यापूर्वी घडले नाही.’’ सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले.

तुमच्या मनात जे आहे, ते माझ्या मनात नाही अन् हशा
शिंदे म्हणाले, ‘‘साहित्यिक मजेदार असतात. ते कधी हसवतील, कधी रडवतील. एखादा फटका मारून वाद, वादळ निर्माण करतील; मात्र, चुकले असल्यास मनाचा मोठेपणा दाखवून ते माफीही मागतात. त्यास मोठेपणा लागतो. ही साहित्याची किमया आहे. (यावर नाव न घेता) तुमच्या मनात जे आहे, ते माझ्या मनात नाही. (यावर उपस्थितांत जोरदार हास्यलाट उसळली.) अक्षरे खोडूनच साहित्य निर्माण होते. मराठी साहित्य महाराष्ट्राला व देशाला सर्वांना सोबत घेऊन जाईल.’’

पाटलांचा वाडा साहित्यमय
सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ‘‘आम्ही ग्र्रामीण भागातील माणसं. ग्रामीण भागात पाटलांचा वाडा लोकप्रिय असतो. गावात पाटलांची किमया मोठी असते. पाटलांचे सर्व जण ऐकतात. पाटलांच्या वाड्यावर आज साहित्य आले असून, यामध्ये वेशीबाहेरच्या साहित्याचाही समावेश आहे, याचा आनंद आहे. पी. डी. पाटील यांनी ज्या भव्यतेने हे संमेलन घेतले आहे, ते यापूर्वी झालेले नाही आणि पुढच्या शंभर वर्षांत होणार नाही.’’

माजी संमेलनाध्यक्षांसाठी लाखाचा कृतज्ञता निधी
आपल्या प्रास्ताविकातून स्वागताध्यक्ष डॉ. पाटील यांनी संमेलनाच्या १३८ वर्षांच्या परंपरेचा गौरव केला. ते म्हणाले की, जास्तीत जास्त माजी संमेलनाध्यक्षांना या संमेलनात कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बोलावले. या सोहळ्यास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तसेच विश्व साहित्य संमेलनातील आजी-माजी संमेलनाध्यक्ष उपस्थित राहिले. त्यांचा सन्मान करण्याची संधी मिळाली, हा आनंद मोठा आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आम्हाला प्रयत्न करता आला ही भाग्याची गोष्ट आहे. ’’ साहित्य संमेलनाच्यानिमित्ताने सचिन इटकर यांनी एक विशेष घोषणा केली. ते म्हणाले, ‘‘हयात असणाऱ्या सर्व माजी संमेलनाध्यक्षांसाठी कृतज्ञता निधी देण्याची डॉ. पाटील यांची संकल्पना आहे. या कार्यक्रमास येऊ न शकणाऱ्या निमंत्रित माजी संमेलनाध्यक्षांनाही एक लाखाचा निधी देण्यात येईल.’’

Web Title: Lightening the material flow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.