प्रकाश चॅम्पियन आॅफ चॅम्पियन्स
By Admin | Updated: December 19, 2014 15:30 IST2014-12-19T00:52:33+5:302014-12-19T15:30:22+5:30
म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील शूटिंग रेंजवर ही स्पर्धा सुरू आहे. १० मीटर एअर पिस्टल प्रकारातील विविध गटांमध्ये पदक

प्रकाश चॅम्पियन आॅफ चॅम्पियन्स
पुणे : राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत आज कर्नाटकच्या पी. एन. प्रकाश याने चॅम्पियन्स आॅफ चॅम्पियन्सचा किताब पटकावला. महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या साताऱ्याच्या शीतल थोरात हिने सुवर्णवेध घेत दिवस गाजवला.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील शूटिंग रेंजवर ही स्पर्धा सुरू आहे. १० मीटर एअर पिस्टल प्रकारातील विविध गटांमध्ये पदक जिंकणाऱ्यांपैकी ८ अव्वल खेळाडूंमध्ये ‘चॅम्पियन्स आॅफ चॅम्पियन्स ही स्पर्धा घेण्यात आली. यात प्रकाशने अंतिम फेरीत १०.१, ९.९ आणि १०.५ अशी ३०.५ गुणांची कमाई करीत बाजी मारली. उत्तराखंडच्या प्रेरणा गुप्ताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तिने २८.१ गुणांचा (८.५, ९.४ आणि १०.२) स्कोअर केला. प्रकाशला ५० हजार, तर प्रेरणाला १० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेत जीतू रॉय, समरेश जंग, शीतल थोरात, एस. रिझवी, प्रशांत नागरे आणि विपीन राणा हेदेखील सहभागी झाले होते.
महिलांच्या १० मीटर एअर पिस्टल प्रकारामध्ये १९९ गुण पटकावणारी शीतल अव्वल ठरली. पंजाबच्या हरवीन साहू (१९७.३) हिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. प्रेरणा गुप्ताने (१७३.९) कांस्यपदक मिळवले. याच प्रकारातील सांघिक गटामध्ये महाराष्ट्राचे सुवर्ण ५ गुणांनी हुकले. सीआरपीएफने ११२२ गुण घेत अव्वल स्थान पटकावले. रौप्यपदकविजेत्या महाराष्ट्राने १११७ गुणांची कमाई केली. या संघात राही सरनोबत (३७५), श्रेया गावंडे (३७३) आणि मनीषा राठोड (३६९) यांचा समावेश होता. हरियानाच्या वाट्याला कांस्यपदक आले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण भारतीय रायफल संघटनेचे सचिव डी. व्ही. सीताराम यांच्या हस्ते झाले. या वेळी स्पर्धा संयोजन समितीच्या प्रमुख शीला कानुगो आणि सचिव अशोक पंडित उपस्थित होते. (क्रीडा प्रतिनिधी)