पुणे : ‘कार्बनचक्रात दिवसेंदिवस मानवी हस्तक्षेप वाढत आहे. प्रत्येकाने आपला कर्बभार नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी जीवनशैलीत बदल घडवून आणणे गरजेचे असून, सर्वांनी एकत्रितपणे सामाजिक व व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न करायला हवेत’, असे मत पुण्यातील समुचित एन्व्हायरोटेकच्या संचालिका डॉ. प्रियदर्शिनी कर्वे यांनी व्यक्त केले.मराठी विज्ञान परिषद, मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्र आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने सेनापती बापट रस्त्यावरील विज्ञानशोधिकेच्या सभागृहात आयोजित वैज्ञानिक कट्ट्यावर डॉ. कर्वे बोलत होत्या. ‘मोजा आपला कर्बवापर’ या विषयावर डॉ. कर्वे यांनी विज्ञानप्रेमींशी गप्पा मारल्या. याप्रसंगी ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. विद्याधर बोरकर, अॅड. अंजली देसाई, संजय मालती कमलाकर आदी उपस्थित होते.कर्वे म्हणाल्या, ‘जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार दोन हा कर्बभार आदर्श आहे. माणसाने हा कर्बभार नियंत्रित ठेवण्यासाठी स्वत:पासून सुरु करायला हवी. स्वत:च्या सवयीत बदल करायला हवा. तंत्रज्ञान बदलायला हवे. कर्बभारावर परिणाम करणारे तंत्रज्ञान टाळायला हवे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासह रस्त्यांचा दर्जा उंचावला पाहिजे. शाश्वत विकासासाठी शुद्ध वातावरण असणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने रोजगाराचे मार्ग शोधायला हवेत.’ या वेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत डॉ. प्रियदर्शिनी कर्वे यांनी पर्यावरणपूरक गोष्टीचे महत्त्व पटवून दिले. सौरऊर्जा, पवनऊर्जा हे सद्यस्थितीतील इंधनांना पर्याय असल्याचेही त्या म्हणाल्या. डॉ. विद्याधर बोरकर यांनी प्रास्ताविक केले. अॅड. अंजली देसाई यांनी आभार मानले.
कर्बभार कमी करण्यासाठी जीवनशैलीत बदल आवश्यक : डॉ. प्रियदर्शिनी कर्वे; ‘कर्बवापर’वर गप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 13:38 IST
मराठी विज्ञान परिषद, मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्र आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने सेनापती बापट रस्त्यावरील विज्ञानशोधिकेच्या सभागृहात वैज्ञानिक कट्ट्याचे आयोजन करण्यात आले होते.
कर्बभार कमी करण्यासाठी जीवनशैलीत बदल आवश्यक : डॉ. प्रियदर्शिनी कर्वे; ‘कर्बवापर’वर गप्पा
ठळक मुद्देकार्बनचक्रात दिवसेंदिवस मानवी हस्तक्षेप वाढत आहे : डॉ. प्रियदर्शिनी कर्वेसेनापती बापट रस्त्यावरील विज्ञानशोधिकेच्या सभागृहात वैज्ञानिक कट्टा