आयुष्य ‘लॉक’; पेट्रोल दरवाढ ‘अनलॉक’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:09 IST2021-05-15T04:09:45+5:302021-05-15T04:09:45+5:30
मे महिन्यात आतापर्यंत सहा वेळा दरवाढ लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र सह अन्य राज्यात कडक ...

आयुष्य ‘लॉक’; पेट्रोल दरवाढ ‘अनलॉक’ !
मे महिन्यात आतापर्यंत सहा वेळा दरवाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र सह अन्य राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले.याचा विपरीत परिणाम उद्योगधंद्यांवर झाला आहे. लाखो लोकांचे रोजगार बुडाले आहे. आयुष्य जणू लॉक झाले. मात्र दुसरीकडे पेट्रोलची दरवाढ सुरूच आहे. मे महिन्यात आतापर्यंत सहा वेळा दरवाढ झाली. ३० एप्रिलला पेट्रोलचा प्रतिलिटर ९६.४५ असणारा भाव ९९ च्या घरात पोहचला. बुडणारा रोजगार व वाढत जाणारी महागाई यात सर्वसामान्यांना जगणे मुश्किल झाले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात तेल उत्पादन करणाऱ्या काही देशांनी कच्च्या तेलाचं उत्पादन कमी केलं आहे. दुसरीकडे मागणी आहे तेवढीच आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी कच्या तेलाच्या किमती वाढ प्रतिबॅलर वाढ होत आहे. या किमती ५० ते ६० डॉलर प्रतिबॅलर इतक्या झाल्या आहे. कच्च्या तेलावर प्रक्रिया करणे ही देखील मोठी खर्चिक बाब आहे. त्यामुळे तेलाच्या किमतीत वाढ होत असल्याचे तेल कंपन्यांना कडून सांगण्यात येते.
बॉक्स :
तेलाच्या किमतीपेक्षा टॅक्सच जास्त
तेलाच्या मूळ किमतीचा विचार केला तर ती जवळपास ३० ते ३५ रुपये इतकी असते. मात्र त्यावर आकारण्यात आलेल्या विविध करांमुळे त्याची किंमत मोठ्या प्रमाणात वाढते. केंद्राकडून उत्पादन शुल्क व कृषी अधिभार असे मिळून पेट्रोलवर ३२ रुपये आणि डिझेलवर ३१ रुपये प्रतिलिटर आकारले जातात. राज्य सरकारकडून व्हॅट व अन्य कर असे मिळून पेट्रोलवर २७ रुपये तर डिझेलवर १७ रुपये प्रतिलिटर आकारले जातात.
नागरिकांच्या प्रतिक्रिया
१) सध्या लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अनेक जण आर्थिक संकटात सापडले आहे. तर दुसरीकडे पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. मला माझ्या व्यवसाय निमित्ताने रोज गाडीवरून फिरावे लागते. वाढणारे पेट्रोलचे दर हे परवडणारे नाही. सरकारने ही परिस्थिती लक्षात घेता काही दिवस तरी पेट्रोल दरवाढ रोखावी.
-पूजा डोईफोडे, नागरिक
२) पेट्रोल आता शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. अनेकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. वाढणारे हे दर परवडणारे निश्चितच नाही. पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील बंद आहे. सर्वसामान्यांना रिक्षाचे दर देखील परवडत नाही. अशीच परिस्थिती कायम राहिली तर येणाऱ्या काळात सायकलवरूनच फिरावे लागेल, असे वाटते.
-संजीव भोंडे, नागरिक