ज्येष्ठ नागरिकाच्या खूनप्रकरणी जन्मठेप
By Admin | Updated: February 4, 2015 00:22 IST2015-02-04T00:22:52+5:302015-02-04T00:22:52+5:30
चोरी केल्याचे पाहिल्याने ७० वर्षीय मालकाचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी नोकराला जन्मठेप आणि ३ हजार रुपये दंडाची शिक्षा मुख्य जिल्हा न्यायाधीश भोजराज पाटील यांनी सुनावली.

ज्येष्ठ नागरिकाच्या खूनप्रकरणी जन्मठेप
पुणे : चोरी केल्याचे पाहिल्याने ७० वर्षीय मालकाचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी नोकराला जन्मठेप आणि ३ हजार रुपये दंडाची शिक्षा मुख्य जिल्हा न्यायाधीश भोजराज पाटील यांनी सुनावली.
श्याम धिसालाल पाडीयार (वय २३, रा. मध्य प्रदेश) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. विनोद धीरजलाल पारेख (वय ७०, रा. कोणार्कपुरम सोसायटी, कोंढवा) असे खून झालेल्यांचे नाव आहे. २८ मे २०११ रोजी ही घटना घडली. या प्रकरणात सरकारी वकील विकास शहा यांनी १० साक्षीदार तपासले. फिर्यादी, विनोद यांची पत्नी हिरालक्ष्मी, शवविच्छेदन करणारे डॉक्टर, आरोपीच्या पिशवीतून पोलिसांनी जप्त केलेली रक्कम आणि वैद्यकीय तपासणी महत्त्वाची ठरली. या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून तत्कालीन पोलीस निरीक्षक मिलिंद ठोसर यांनी काम पाहिले. त्यांना सहायक पोलीस फौजदार दत्तात्रय पवार यांनी मदत केली.
विनोद यांची मुलगी मुंबई येथे राहते. त्यांच्याकडे २००८ पासून श्याम कामाला होता. आई-वडील वयस्कर, आजारी असल्याने मुलीने श्याम याला देखभालीसाठी विनोद यांच्या कोंढवा येथील घरी २४ मे २०११ रोजी पाठविले. विनोद यांच्या घरात तिने खोल्या होत्या. एका खोलीत विनोद, दुसऱ्या खोलीत पत्नी हिरालक्ष्मी राहत होत्या. तिसरी खोली त्यांनी श्याम याला दिली होती. घटनेच्या दिवशी रात्री १ वाजता श्याम विनोद यांच्या खोलीमध्ये गेला. कपाटातून पैसे चोरू लागला. ते विनोद यांनी पाहिले. त्यामुळे त्याने विनोद यांचा गळा दोन्ही हातांनी दाबला. छातीवर बुक्के मारले. हा आवाज ऐकून हिरालक्ष्मी विनोद यांच्या खोलीत गेल्या. त्या वेळी श्याम विनोद यांच्या कॉटजवळ दिसला. बाबुजीको कुछ हो गया है, असे श्यामने हिरालक्ष्मी यांना सांगितले. त्यामुळे हिरालक्ष्मी यांनी अपार्टमेंटमध्ये राहणारे डॉ. बॅनर्जी यांना बोलाविले. त्या वेळी विनोद यांची प्रकृती गंभीर असून, रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला बॅनर्जी यांनी दिला. त्यानुसार विनोद यांना इनामदार रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान मृत्यू झाला.
४विनोद यांना नीट बोलता येत नव्हते. ते घोगऱ्या आवाजात बोलत होते. त्यामुळे डॉ. अनिल केरबा शेडगे यांनी विनोद यांना लिहिण्यासाठी कागद आणि पेन दिला. त्या वेळी श्याम याने कपाट उघडले. त्यात १ लाख रुपये असून, पत्नी हिरालक्ष्मी यांच्या जीवाला धोका असल्याचे विनोद यांनी लिहून दिले. त्यानुसार डॉ. शेडगे यांनी याबाबतची फिर्याद हडपसर पोलिसात दिली. पोलिसांनी श्याम याला अटक केली. त्याच्या खोलीत कॉटखाली असलेल्या पिशवीतून पोलिसांनी ६९ हजार ५१ रुपये जप्त केले.