‘कोयता गँग’च्या ८ जणांना जन्मठेप
By Admin | Updated: March 23, 2015 23:07 IST2015-03-23T23:07:47+5:302015-03-23T23:07:47+5:30
‘कोयता गँग’मधील आठ आरोपींना राजगुरुनगर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

‘कोयता गँग’च्या ८ जणांना जन्मठेप
राजगुरुनगर : आळंदीमधील २०१२ मध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी कुख्यात ‘कोयता गँग’मधील आठ आरोपींना राजगुरुनगर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. राजगुरुनगर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा हा आजवरचा सर्वात महत्त्वाचा निकाल आहे.
आळंदी येथे ८ जून २०१२
रोजी पद्मावती झोपडपट्टीसमोर गंगाधर ऊर्फ पिन्या रामभाऊ गडदे (वय २२) आणि गजानन रखमाजी नवघरे
(वय १९, दोघेही रा. इंद्रायणीनगर, आळंदी देवाची, ता. खेड, जि. पुणे) यांच्यावर कोयत्याने वार करून
आणि दगडाने ठेचून खून ‘कोयता गँग’च्या अकरा जणांनी त्यांचे खून केले होते.
या हत्याकांडात वरील आठही आरोपींना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी २० मार्च रोजी दोषी ठरवीत त्यांच्या शिक्षेचा निकाल आजपर्यंत राखून ठेवला होता. आज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
या आठ आरोपींना खून प्रकरणी जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ४ महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. याबरोबरच भा. दं. वि. कलम १४३ (बेकायदेशीर जमाव जमविणे) अन्वये ६ महिने सक्तमजुरी आणि ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस सक्तमजुरी, कलम १४७ (दंगल करणे) अन्वये १ वर्ष सक्तमजुरी व
५०० रुपये दंड व दंड न भरल्यास २ महिने सक्तमजुरी, कलम १४८ (घातक शस्रे बाळगून दंगल माजवणे)
अन्वये २ वर्षे सक्तमजुरी व ५००
रु. दंड व दंड न भरल्यास २ महिने सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या दुहेरी खुनातील साक्षीदार २० मार्च रोजी तपासण्यात आले. यामध्ये ५ साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली. या घटनेचा प्रथमदर्शी साक्षीदार बालाजी रामभाऊ गडदे याची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील अरुण बबनराव ढमाले यांनी काम पाहिले. निकालानंतर पोलीस बंदोबस्तात आरोपींना येरवडा कारागृहात नेण्यात आले. (वार्ताहर)
४या खून प्रकरणी शिवाजी बाबूराव भेंडेकर (वय २५), मयूर एकनाथ मानकर (वय २१, दोघेही रा. पद्मावती झोपडपट्टी, आळंदी देवाची), पिंटू ऊर्फ प्रशांत मुरलीधर चव्हाण (वय २९, रा. चऱ्होली बुद्रुक, ता. खेड), ज्ञानेश्वर सिद्धार्थ बडगे (वय २१), राहुल संदीप चव्हाण (वय २१, दोघेही रा. नगरपालिका चौक, आळंदी देवाची, ता. खेड), वीरभद्र ऊर्फ देवा रघुनाथ देवाज्ञ (रा. तारांगण वसतिगृह, धायकरवाडी, डुडूळगाव, ता. हवेली), सोमनाथ सुधाकर खुडे (वय ३२), राम महादू भोकरे (वय २३, दोघेही रा. इंद्रायणीनगर, आळंदी, ता. खेड) यांच्यासह अन्य तिघांवर खुनाचे आरोपपत्र येथील न्यायालयात ठेवण्यात आले होते. तीन आरोपी अद्यापही फरार असल्याने आठ आरोपींवर हा खटला सुरू होता.