सहा महिने कचरा टाकू द्यावा

By Admin | Updated: January 5, 2015 00:56 IST2015-01-05T00:56:22+5:302015-01-05T00:56:22+5:30

उरुळी देवाची व फुरसुंगी येथील कचरा डेपोत ३१ डिसेंबरनंतर कचरा टाकला जाणार नाही, असे ठरले होते; मात्र कचऱ्याला पर्यायी मार्ग शोधण्यासाठी अजून सहा महिन्यांचा वेळ लागणार आहे.

Let's litter for six months | सहा महिने कचरा टाकू द्यावा

सहा महिने कचरा टाकू द्यावा

पुणे : उरुळी देवाची व फुरसुंगी येथील कचरा डेपोत ३१ डिसेंबरनंतर कचरा टाकला जाणार नाही, असे ठरले होते; मात्र कच-याला पर्यायी मार्ग शोधण्यासाठी अजून सहा महिन्यांचा वेळ लागणार आहे. ग्रामस्थांचा मात्र आता प्रशासनावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे त्यांना ‘अजून ६ महिने कचरा टाकू द्या, त्यानंतर कचरा टाकणार नाही,’ असे प्रतिज्ञापत्रावर लिहून देऊन विनंती करणार असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.
सजग नागरिक मंचच्या वतीने शहराच्या प्रश्नांवर गिरीश बापट यांच्याशी नागरिकांचा संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नागरिकांनी कचरा, वाहतूक, मेट्रो आदी महत्त्वाचे प्रश्न मांडले. या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची बापट यांनी या वेळी माहिती दिली.
बापट म्हणाले, ‘‘सध्या कचरा प्रश्नांची सोडवणूक करण्यास मी प्राधान्य देत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी येत्या ८ जानेवारीला ग्रामस्थांची बैठक आयोजित केली आहे. संघर्ष करून प्रश्न सुटणार नाही. अजून सहा महिने कचरा टाकू द्या, अशी त्यांच्याकडे विनंती केली जाणार आहे. कचरा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विविध पर्यायांचा विचार करण्यात आला आहे. रोखेम, दिशा या प्रकल्पांची कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता मोठी आहे. या प्रकल्पांची क्षमता वाढविण्यासाठी त्यांना सर्वतोपरी मदत केली जाणार आहे. मोशी येथील कचरा डेपोत आणखी ४ ते ५ महिने कचरा टाकू द्यावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला कचरा जिरविण्यासाठी यापुढील काळात भर देणार आहे.’’
सांडपाण्यावर प्रक्रिया करून बेबी कॅनॉलद्वारे शेतीला दोन टीएमसी पाणी मार्चपर्यंत देण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्यामध्ये यश मिळाल्यास पुण्याला पिण्यासाठी मोठ्याप्रमाणात पाणी उपलब्ध होऊ शकेल, असे बापट यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Let's litter for six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.