बेशिस्त वाहतुकीला धडा

By Admin | Updated: June 13, 2015 22:28 IST2015-06-13T22:28:49+5:302015-06-13T22:28:49+5:30

जुन्नर बसस्थानक परिसर, बोडकेनगर, गजबजलेले शंकरपुरा पेठ, सदाबाजारपेठ अशा ठिकाणी कार पार्किंग व दुचाकी पार्किंगचे काही

Lessons for Uncertainty Traffic | बेशिस्त वाहतुकीला धडा

बेशिस्त वाहतुकीला धडा


जुन्नर : जुन्नर बसस्थानक परिसर, बोडकेनगर, गजबजलेले शंकरपुरा पेठ, सदाबाजारपेठ अशा ठिकाणी कार पार्किंग व दुचाकी पार्किंगचे काही ठिकाणी फ्लेक्स लावलेले असतानाही वाहतुकीस अडथळा करून बेशिस्त पार्किंग करणा-यांना जुन्नर पोलीस यंत्रणेने धडा शिकवत वाहनांची हवा सोडली.
नगरपरिषद असणा-या जुन्नर शहराची लोकसंख्या विचारात घेता, सध्या जुन्नर शहराला वाहतुकीची समस्या भेडसावत असताना पोलीस निरीक्षक कैलास पिंगळे यांनी पुढाकार घेतला. जुन्नर शहरात काही ठिकाणी ‘नो पार्किंग’ तर काही ठिकाणी सम विषम तारखेला पार्किंग असे फ्लेक्स जुन्नर शहरात सर्वत्र लावले आहेत. त्यासाठी त्यांना जुन्नर शहरातील गणेश मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, जुन्नर व्यापारी असोसिएशन शांतता समितीचे सदस्य, पत्रकार मित्र यांनी मोलाची साथ दिली.
काही दिवस सुरळीत सुरू असलेली पार्किंगची कोंडी सुटली व पुन्हा जशी होती तशी परिस्थिती निर्माण व्हायला लागल्याचे लक्षात आले. केवळ खटले न भरता व दंडात्मक कारवाई न करता वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या बेशिस्त वाहनधारकांच्या वाहनांच्या दोन्ही चाकांतील हवा सोडून वाहनचालकांना शिस्त लावण्याचा एक प्रयत्न जुन्नर पोलिस करीत आहेत.
वाहतूक नियोजनामध्ये जुन्नर नगरपरिषदेचा मोठा वाटा पाहिजे होता. परंतु, आधीच जुन्नर शहरातील रस्त्यांची लागलेली वाट व खोळंबलेली पाणी पाईप लाईन योजना, अकार्यक्षम प्रशासन यामुळे जुन्नरवासीयांना गेल्या काही वर्षांत सुविधा मिळाल्या नाहीत.
महापालिका पार्किंग व्यवस्थेत काय योगदान देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, जुन्नर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास पिंगळे यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाल ेकी, जुन्नर शहर हे ऐतिहासिक शहर असून मोठ्या प्रमाणावर पर्यटकही येत असतात. बेशिस्त पार्किंगची समस्या त्यांनाही भेडसवते. ज्या जड मालाच्या गाड्या वाहतूक समस्या निर्माण करतात, त्यांच्यावर केवळ दंडात्मक कारवाई न करता गुन्हे दाखल करण्यात येईल. (वार्ताहर)

Web Title: Lessons for Uncertainty Traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.