बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न
By Admin | Updated: March 21, 2015 23:12 IST2015-03-21T23:12:37+5:302015-03-21T23:12:37+5:30
काळवाडी (ता. जुन्नर) येथे विहिरीवरील मोटार बंद करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा बिबट्याने पाठलाग करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न
पिंपळवंडी : काळवाडी (ता. जुन्नर) येथे विहिरीवरील मोटार बंद करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा बिबट्याने पाठलाग करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी जिवाच्या आकांताने पळ काढल्यामुळे ते या हल्ल्यातून बचावले. ही घटना बुधवारी (दि. १९) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली.
जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. बिबट्याने अनेक शेतकऱ्यांची पाळीव जनावरे फस्त केली आहेत. तसेच माणसांवरही हल्ले झाले आहेत. येथील शेतकरी विलास कोंडिभाऊ वामन हे काळवाडी उंब्रज रस्त्याने विहिरीवरील मोटार बंद करून येत असताना या रस्त्याच्या उजव्या बाजूने जात होते. अचानक रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या उसात दडून बसलेला बिबट्या वामन यांना दिसला. समोर बिबट्या दिसताच त्यांना दरदरून घाम फुटला. त्यांनी मोठ्या धाडसाने आरडाओरडा करीत जिवाच्या आकांताने पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, बिबट्याने हल्ला करण्यासाठी त्यांचा पाठलाग केला. ते पुढे आणि पाच ते सात फूट अंतरावर बिबट्या त्यांचा पाठलाग करीत होता. त्यानंतर काही क्षणांतच त्यांनी तेथील एका घराजवळ आश्रय घेतला. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी त्यांना सावरले.
यापूर्वीही बिबट्याने दोघांचा पाठलाग करून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षत्र असल्यामुळे बिबट्यांची अन्न, पाणी आणि निवाऱ्याची गरज भागत आहे. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. तालुक्यातील बहुतेक गावे बिबट्याप्रवण क्षेत्रात येतात. बिबट्याच्या वाढत्या उपद्रवामुळे मानवाची सुरक्षितता धोक्यात येऊ लागली आहे. वनखात्याने तत्काळ पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
बिबट्याची दहशत, दोन शेळ्यांचा फडशा
४न्हावरे : नागरगाव (ता. शिरूर) परिसरात बिबट्याचा वावर वाढल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
४नागरगाव येथे दोन दिवसांत बिबट्याने दोन शेळ्यांचा फडशा पाडला. याचबरोबर, उसाच्या शेतामध्ये अनेक शेतकऱ्यांनी बिबट्याला प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यामुळे येथील शेतकरी बिबट्याच्या भीतीच्या सावटाखाली शेतात काम करीत आहेत.
४दोन महिन्यांपूर्वीच येथील एक विहिरीच्या पाण्यात पडलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आलेल्या वन कर्मचाऱ्यांना चकवा देऊन विहिरीतून बिबट्याने धूम ठोकली होती. दरम्यान, त्या वेळी बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी आणलेले पिंजरे अद्याप धूळ खात पडले आहेत. किमान ते पिंजरे बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात लावण्यात यावेत, अशी मागणी वारंवार ग्रामस्थांनी करूनदेखील त्याबाबत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून कुचराई होत असल्याचे उघड झाले आहे.