रांजणगाव गणपती : कोंढापुरी (ता. शिरुर) येथील पुणे - नगर महामार्गावर रस्ता ओलांडताना बिबट्याला अहिल्यानगर बाजूने आलेल्या अज्ञात वाहनाची धडक बसून बिबट्या ठार झाल्याची घटना घडली असून, वनविभागाने मृत बिबट्याला ताब्यात घेतले आहे.कोंढापुरी (ता. शिरुर) येथील पुणे - नगर महामार्गावर २२ एप्रिल रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला अहिल्यानगर बाजूने आलेल्या अज्ञात वाहनाची धडक बसून बिबट्या गंभीर जखमी होऊन मृत झाला.
दरम्यान, पुणे - नगर रस्त्यावर वाहतूककोंडी होऊन नागरिकांची गर्दी झाली. याबाबतची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांना मिळताच वनपाल गौरी हिंगणे व भानुदास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक प्रमोद पाटील, संतोष भुतेकर, अभिजित सातपुते, निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व वनविभाग बिबट शीघ्र कृती दलाचे शेरखान शेख, सर्पमित्र श्रीकांत भाडळे यांनी घटनास्थळी धाव घेत येथील सतीश गायकवाड, अतुल गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यासह अन्य नागरिकांच्या मदतीने मृत बिबट्याला ताब्यात घेतले.अपघातातील मृत बिबट्या हा अंदाजे नऊ वर्षे वयाचा आणि नर जातीचा होता. त्याचे शवविच्छेदन करीत दहन करण्यात आल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी सांगितले.