बिबट्याचा बछडा आईच्या कुशीत
By Admin | Updated: July 5, 2015 00:02 IST2015-07-05T00:02:13+5:302015-07-05T00:02:13+5:30
वडगाव आनंद येथे काल सायंकाळी कोरड्या विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला वाचवण्यात वनविभागाला यश आले होते. माणिकडोह येथील आपत्कालीन पथकाने

बिबट्याचा बछडा आईच्या कुशीत
आळेफाटा : वडगाव आनंद येथे काल सायंकाळी कोरड्या विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला वाचवण्यात वनविभागाला यश आले होते. माणिकडोह येथील आपत्कालीन पथकाने हा बछडा विहिरीजवळ मध्यरात्री ठेवला अन् पहाटेच्या सुमारास या बछड्याची आई घेऊन गेली, अशी माहिती या पथकाचे डॉ. अजय देशमुख यांनी दिली. दरम्यान वनविभागाने जीवदान दिलेला बछडा पुन्हा एकदा त्याच्या आईच्या कुशीत विसावला. मात्र वडगाव आनंद परिसरातील नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत आजही कायम आहे.
या परिसरातील कळमजाईमातेच्या डोंगरपायथ्याशी असलेल्या चिंचखांड येथे रोहिदास गंगाराम देवकर यांच्या पंचवीस फूट खोल कोरड्या विहिरीत शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास बिबट्याचा बछडा पडला होता. या बछड्याला वनविभाग व माणिकडोह येथील आपत्कालीन पथकाने जीवदान दिले. या बछड्याला माणिकडोह येथील बिबट्या निवारण केंद्रात प्राथमिक उपचार वाईल्ड लाईफ एस. ओ. एसचे डॉ. अजय देशमुख यांनी केले. यानंतर पुन्हा या बछड्याला घेऊन हे पथक मध्यरात्री बारा वाजता या विहिरीच्या ठिकाणी आले. त्याला के्रटमध्ये ठेवण्यात आले. हा ३ महिने वयाचा बछडा त्याच ठिकाणी ओरडत होता. अखेर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्याची आई बिबट्याची मादी तेथे आली अन् या बछड्याला घेऊन गेली, अशी माहिती डॉ. अजय देशमुख यांनी दिली.
शिरूरच्या पूर्व भागात बिबट्याची दहशत
रांजणगाव सांडस : नागरगाव (ता. शिरूर) येथे व शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात भीमा व घोडनदीच्या परिसरातील ऊसशेतीमुळे व नदीकाठी असलेली काटेरी कुरणेही बिबट्यास लपण्यासाठी असणारी सुरक्षित जागा आहे. या भागातील नदीकाठच्या अनेक गावांतील शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या लिफ्ट योजना राबविलेल्या आहेत. विद्युत पंप चालू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झालेले आहे.
भक्ष्याच्या शोधार्थ हे बिबटे रात्री-दिवसा मुख्य रस्ता, कच्चे रस्ते, पाणंद रस्ते यावर ठाण मांडून बसलेले असतात. या परिसरातील शेळ््या, कुत्रे यांना बिबट्याने आपले लक्ष्य केले आहे. महिला व शेतकरी, मजूर व बिबट्याच्या धास्तीने शेतात जाण्यास घाबरत आहेत.
मेंढपाळ व्यावसायिक या बिबट्यांच्या भीतीपोटी आपली जनावरे अर्धपोटी चारत असल्याची वस्तुस्थिती आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे नदीकाठच्या परिसरातील शेतात ऊसलागवडी सुरू असल्यामुळे १० ते १५ शेतकरी मजूर एकत्रित काम करताना दिसत आहेत. कारण याच परिसरात शेतकरी काम करीत असताना बिबट्या तर कुठून येणार नाही ना? याची त्यांना धास्ती लागलेली असते.