कळंब परिसरात बिबट्याचा दुचाकीस्वारांवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:04 IST2021-02-05T05:04:07+5:302021-02-05T05:04:07+5:30
मंचर : कळंब (ता. आंबेगाव) परिसरातील कानडेमळा रस्त्यावर प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वरांवर बिबट्याने हल्ला करून एकाला जखमी केले आहे. या ...

कळंब परिसरात बिबट्याचा दुचाकीस्वारांवर हल्ला
मंचर : कळंब (ता. आंबेगाव) परिसरातील कानडेमळा रस्त्यावर प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वरांवर बिबट्याने हल्ला करून एकाला जखमी केले आहे. या परिसरात वारंवार बिबट्याच्या होणाऱ्या हल्ल्यांमुळे नागरिकांनी पिंजरा बसविण्याची मागणी केली आहे. एखाद्या व्यक्तीचा जीव गेल्यावर वनखाते पिंजरा बसवणार का, असा संतप्त सवालही नागरिक करू लागले आहेत.
कळंब येथून लौकी गावाकडे जाणारे महेश दिनकर थोरात व सुदाम रामदास काळे (दोघेही रा. लौकी) हे आपल्या मोटरसायकलवर जात होते. महेश थोरात गाडी चालवत असताना कानडेमळा परिसरात मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास दुचाकीवर बिबट्याने हल्ला केला. त्यात सुदाम काळे यांच्या डाव्या पायाला तीन ठिकाणी व कमरेच्या वरच्या बाजूस जखमा झाल्या आहेत. अचानक घडलेल्या प्रसंगामुळे दोघेजण गोंधळून गेले होते. क्षणाचाही विलंब न करता दोघांनी आरडाओरड करून दुचाकी जोरात पळवत नेल्याने व प्रतिकार केल्यामुळे दोघांचा जीव वाचला आहे.
जवळपास ४० ते ५० फूट अंतरापर्यंत बिबट्या दुचाकीस्वारांचा पाठलाग करत होता, असे काळे यांनी सांगितले. डॉ. बाळकृष्ण थोरात यांनी जखमी सुदाम काळे यांच्यावर औषध उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडले आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यांत येथे तीन जणांना बिबट्याने हल्ला करत जखमी केले आहे. कानडेमळा परिसरात द्राक्ष बागा मोठ्या प्रमाणावर आहेत. येथील तलावात पाणी पिण्यासाठी बिबट्या दररोज येत असल्याचे नागरिक सांगतात. परिसरात मोठ्या प्रमाणात द्राक्षबाग असल्यामुळे अनेक मजूर जीव मुठीत धरून बागामध्ये कामे करतात. कळंब रानुबाई मार्गे लौकी रस्ता बिबट्याच्या उपद्रवामुळे दिवसासुद्धा धोकादायक होऊ लागला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतरच वनखाते बिबट्याला जेरबंद करण्याची कारवाई करणार का, असा संतप्त सवाल शेतकरी करत आहेत. या परिसरात तातडीने पिंजरा लावण्याची मागणी संदेश थोरात, लक्ष्मण थोरात, अनिल थोरात यांनी केली आहे.