बिबट्याचे हल्ले सुरूच!
By Admin | Updated: January 15, 2016 04:04 IST2016-01-15T04:04:40+5:302016-01-15T04:04:40+5:30
जुन्नर तालुक्यात बिबट्याचे हल्ले वाढल्याने दहशत पसरली आहे. बेल्हा परिसरात मंगळवारी हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच साकोरीत गुरूवारी

बिबट्याचे हल्ले सुरूच!
बेल्हा : जुन्नर तालुक्यात बिबट्याचे हल्ले वाढल्याने दहशत पसरली आहे. बेल्हा परिसरात मंगळवारी हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच साकोरीत गुरूवारी एका बच्छड्याने एकावर हल्ला केला. त्यात ते जखमी झाल्या आहेत.
सुरेश सखाराम गाडगे असे त्यांचे नाव आहे. खुटाळमळ्याच्या पुलाजवळ साकोरीच्या हद्दीत गाडगे यांची शेती आहे. ते उसाच्या शेतात पाणी देण्यासाठी आले असतानाच उसामधे दबा धरून बसलेल्या बिबट्याच्या बछड्याने त्यांच्या हातावरच उडी घेतली, त्या वेळी ते खाली पडले. बिबट्याने त्यांच्या हाताला ओरखडले. त्यामुळे जखमा झाल्या. ते अत्यंत घाबरलेल्या अवस्थेतच आले. त्यांनी परिसरातील ग्रामस्थांना माहिती दिली. त्यांना ताबडतोब निमगावसावा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी दाखल केले आहे.
रानमळा येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार झाली होती, ते ठिकाण १ ते २ किलोमीटरवर आहे. या ठिकाणी चारंगबाबांच्या ओढ्याजवळ भाऊसाहेब थोरात यांना एक बिबट्या व दोन बछडे दिसून आले असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. या पूर्व भागात सर्वच गावांमध्ये बिबट्याचीच भीती असून जीव धोक्यात घालून ग्रामस्थ ये-जा करीत आहेत.
वडगाव कांदळीत ३ शेळ्या ठार
आळेफाटा : वडगाव कांदळी (ता. जुन्नर) येथील निलख मळा शिवारातील गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करून तीन शेळ्या ठार केल्याची घटना घडली. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. लक्ष्मण दादाभाऊ फुलसुंदर यांच्या घरासमोर गोठा आहे. गोठ्याच्या भिंतीवरून बिबट्याने आत प्रवेश करून आतील तीन शेळ्यांचा फडशा पाडला.
कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे बिबट्याने भक्ष जागीच सोडून बाजूच्या शेतात धूम ठोकली. या वेळी फुलसुंदर यांनाही जाग आली व त्यांना शेळ्या ठार झाल्याचे दिसून आले. दरम्यान, वनपाल अनिल सोनवणे, वनरक्षक मनीषा बनसोडे व नाथा भोर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला.
पिंंजरा लावा
पशुधनावर हल्ले वाढत आहेत. वडगाव कांदळी (ता. जुन्नर) येथे तीन तर पिंपरी पेंढार परिसरात
एक शेळी फस्त केल्याने या दोन्ही गावातील ग्रामस्थांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.
पिंपरी पेंढारला शेळी ठार
आळेफाटा : पिंपरी पेंढार परिसरात घराशेजारील गोठ्यात बांधलेल्या शेळीवर बिबट्याने हल्ला करून तिचा फडशा पाडला. गाजरपट शिवारातील सुरेश दामोधर डेरे यांच्या राहत्या घराशेजारील असणाऱ्या गोठ्यामध्ये बांधलेल्या शेळीवर काल बुधवारी (दि. १३) रात्री आठच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. यानंतर बिबट्याने ही शेळी बाजूच्या शेतात नेऊन ठार केली. वन विभागाचे कर्मचाऱ्यांनी पाऊलखुणांवरून त्यांनी या घटनेचा पंचनामा केला आहे. दोनच दिवसांपूर्वी येथील जांभुळपट शिवारातील शेतजमिनीतील विहिरीत बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळला होता.