बाजारतळ सोडून व्यावसायिकांचा सेवा रस्त्यावरच ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:22 IST2021-09-02T04:22:36+5:302021-09-02T04:22:36+5:30
कुरकुंभ : राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या माध्यमातून कुरकुंभ (ता. दौंड) येथे पुणे-सोलापूर महामार्गावर मुख्य चौकात भराव पुलाखाली बसणाऱ्या भाजीपाला व्यावसायिकांना ...

बाजारतळ सोडून व्यावसायिकांचा सेवा रस्त्यावरच ठिय्या
कुरकुंभ : राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या माध्यमातून कुरकुंभ (ता. दौंड) येथे पुणे-सोलापूर महामार्गावर मुख्य चौकात भराव पुलाखाली बसणाऱ्या भाजीपाला व्यावसायिकांना हटवण्यात आले होते. मात्र, या व्यावसायिकांनी मोकळ्या बाजारतळाऐवजी सेवा रस्ता व मुख्य चौकातील मोकळ्या जागेवर ठाण मांडल्याने वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. दरम्यान, अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे या व्यावसायिकांच्या जागेचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी ग्रामीण भागातील आठवडे बाजार बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे व्यावसायिकांना जागेअभावी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या मोकळ्या जागेचा वापर करावा लागला. कोरोना काळात वेळेच्या निर्बंधासह व्यवसाय होत होते तर वाहतूकदेखील कमी असल्याने वाहतूक समस्या व अपघात याची शक्यता नव्हती. मात्र आता बऱ्याच प्रमाणात निर्बंध शिथिल झाल्याने वाहतूक वाढीमुळे समस्या निर्माण होत आहे. दरम्यान ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून देखील व्यावसायिकांना बाजारतळाचा वापर करून सुरक्षित अंतरावर व्यवसाय करण्यास सांगितले जात आहे. मात्र याकडे व्यापारी दुर्लक्ष करत आहेत. कोरोना काळातील विविध रोजगाराच्या संधीमध्ये दैनंदिन जीवनातील उपयोगात येणारे, भाजीपाला व्यवसाय करणारे व्यावसायिक वाढले व जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्य चौकात असणाऱ्या जागेत अनेकवेळा व्यापाऱ्यांमध्ये भांडणे वाढल्याने, वाहतुकीच्या समस्या व अपघाताच्या शक्यतेने शेवटी कारवाई झाली. मात्र ठोस निर्णय झाला नसल्याने रस्त्यावरच दुकाने दिसून येत आहेत. सध्या शासनाने निर्बंध उठवले असून आठवडे बाजाराबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे. मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका समोर असताना यावर काहीच तोडगा निघत नाही परिणामी रस्त्यावर उभारलेल्या दुकांनामुळे गर्दी टाळण्याचा मुख्य हेतूच बाजूला राहून जागेअभावी उलट गर्दी वाढत असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे अपघाताच्या शक्यतेने नवीन समस्येची देखील भर पडली आहे.
मोकळ्या जागेत क्रेन व रुग्णवाहिका
पुलाखालील दुकाने उठवल्याने त्याजागी राष्ट्रीय महामार्गावर अपघातातील आपत्कालीन सेवेतील क्रेन व रुग्णवाहिका ठेवण्यात आली होती. त्यांना पुन्हा टोल नाक्यावर पाठवण्यात आले आहे. मात्र त्यांना पुन्हा कुरकुंभमध्ये ठेवण्याची मागणी होत आहे. अपघात समयी याच यंत्रणा दहा किलोमीटर असणाऱ्या टोल नाक्यावरून मागवण्यात येत असतात.