आघाडीचे अजूनही जमेना
By Admin | Updated: January 29, 2017 04:23 IST2017-01-29T04:23:53+5:302017-01-29T04:23:53+5:30
काँग्रेसने ७१ जागांची मागणी केली असून, राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना ६२ जागा देण्याची तयारी दाखविली असल्याची माहिती मिळाली. काही जागांवरून काँग्रेस आग्रही आहे.

आघाडीचे अजूनही जमेना
पुणे : काँग्रेसने ७१ जागांची मागणी केली असून, राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना ६२ जागा देण्याची तयारी दाखविली असल्याची माहिती मिळाली. काही जागांवरून काँग्रेस आग्रही आहे. त्यात प्रामुख्याने काँग्रेसमधून ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या रईस सुंडके व बंडू गायकवाड यांच्या जागांचा समावेश आहे. सुंडके यांच्या कोंढवा परिसरातील प्रभागामधील सर्व जागा काँग्रेस मागत आहे. राष्ट्रवादीलाही त्या प्रभागातील सर्व जागा हव्या आहेत. शिवाजीनगर परिसरातील प्रभागात राष्ट्रवादीचे रेश्मा भोसले व काँग्रेसचे दत्ता बहिरट, त्याच भागातील काँग्रेसचे उपमहापौर मुकारी अलगुडे व राष्ट्रवादीचे स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, बोपोडी येथे राष्ट्रवादीचे श्रीकांत पाटील व काँग्रेसचे दिवंगत माजी मंत्री चंद्रकांत छाजेड यांचे चिरंजीव आनंद छाजेड, अशा काही जागा ताठर भूमिकांमुळे वादग्रस्त झाल्या आहेत.
काँग्रेसचे राजकीय वर्चस्व नसलेल्या भागातही ते सर्व जागा मागत आहेत. निवडणुकीत प्रत्येक जागा महत्त्वाची असताना ते अशी भूमिका घेत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणणे आहे. तर, ‘आमचे नगरसेवक घेतले; मात्र तेथील मतदार काँग्रेसचेच आहेत. सर्व जागा राष्ट्रवादीनेच घेतल्या तर काँग्रेसचे तेथील अस्तित्व कसे राहील,’ अशी काँग्रेसची भूमिका आहे. यामुळे या दोन्ही पक्षांतील चर्चेची गाडी पुढे सरकायला तयार नाही. आघाडीची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसने काही काँग्रेस नगरसेवकांचा प्रवेश करून घेतल्यानेही काँग्रेसच्या गोटात संतापाचे वातावरण आहे. दोन्ही पक्षांनी प्रभागनिहाय उमेदवारांची यादी तयार ठेवली आहे. समझोता झाला नाही, तर ही यादी रविवारी जाहीर करण्याच्या तयारीत आहेत.
(प्रतिनिधी)
शिवसेना-भाजपाची स्वतंत्र यादी सोमवारी
युती तुटल्याचे अधिकृतपणे जाहीर झाल्यामुळे भारतीय जनता पार्टी व शिवसेना या दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या सर्व प्रभागांमधील याद्या तयार करण्याच्या कामाला जोरात सुरुवात केली आहे. शिवसेनेची पहिली यादी सोमवारी जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले, तर भाजपानेही विद्यमान नगरसेवकांबरोबरच काही नव्यांचा समावेश असलेली पहिली यादी श्रेष्ठींच्या संमतीसाठी पाठविली आहे.
युती तुटल्याचा उत्साह दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. शहराच्या पूर्व भागातील भाजपाच्या काही प्रभागांमधील इच्छुकांनी तर शनिवारी दुपारीच एकत्रित मिरवणूक काढून मतदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी युती तुटल्याचा जल्लोष तर केलाच; पण आता पोस्टर, पत्रके यातून भाजपाला कसे नामोहरम करायचे, याच्याही कल्पना लढविण्यास सुरुवात केली आहे.
भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची शनिवारी सायंकाळी एक बैठक झाली. त्यात परिवारातील संघटनेच्या मदतीने थेट मतदारांपर्यंत कसे पोहोचायचे व त्यांना आकर्षित कसे करायचे, याची रचना करण्यात आली असल्याची माहिती मिळाली. युती तुटल्याने नुकसान होऊ नये, उलट त्यांची मते आपल्याकडे कशी ओढता येतील, याची रणनीती त्यात ठरविण्यात आली असल्याचे समजते. त्यादृष्टीने टीका करायची नाही, तर शांतपणे मतदारांना समजावून सांगण्याचा व त्यासाठी कार्यकर्ते तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पक्षातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
शिवसेनेतही पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक होऊन त्यात शहरातील प्रभागनिहाय स्थितीचा आढावा घेण्यात आला. भाजपाला धडा शिकवायचाच, असा निर्धार त्यात व्यक्त करण्यात आला. शिवसेनेच्या मुंबईतील स्टार प्रचारकांच्या सभांचे पुण्यात आयोजन करण्याचा निर्णय त्यात झाला असल्याची माहिती मिळाली. एकाचवेळी काँग्रेस-राष्ट्रवादी व भाजपाबरोबरही लढायचे आहे, त्यामुळे नियोजनबद्धरीतीने याचा सामना करायचा, असे बैठकीत ठरविण्यात आले. आक्रमकपणा सोडायचा नाही व आक्रस्ताळेपणाही करायचा नाही, असा सल्ला या बैठकीत काही ज्येष्ठांनी दिला असल्याचे समजते.
भाजपाचे शहराध्यक्ष शनिवारी रात्री उशिरापर्यंत पक्षाशी संबंधित विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यस्त होते. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
भाजपाचीही उमेदवारांची पहिली यादी तयार
असून, त्यात पक्षाच्या विद्यमान सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.
शिवसेनेची पहिली यादी तयार आहे. सर्व प्रभागांसाठी आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत. रविवारी (दि. २९) कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी आम्ही आमची पहिली यादी जाहीर करू.
- विनायक निम्हण,
शहरप्रमुख, शिवसेना
जागा वाटपांचा विचार विजय कसा मिळेल यावर अवलंबून पाहिजे. काँग्रेसकडून तसे न करता केवळ भावनेच्या आधारावर जागांची मागणी करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे वर्चस्व दिसते आहे त्याठिकाणी त्यांनी आग्रह धरणे योग्य नाही. त्यांचे वर्चस्व आहे त्याठिकाणी आम्ही तशीच भुमिका ठेवली आहे, मात्र काही जागांबाबत त्यांची भुमिका ताठर आहे. चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे.
- वंदना चव्हाण,
अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला प्रस्ताव दिला आहे. त्यांच्या निर्णयाची आता प्रतीक्षा आहे. जातीयवादी पक्षांना सत्तेपासून बाजूला ठेवायचे याच भूमिकेतून आम्ही दोन पावले मागे आलो. त्यांचीही अशीच भूमिका असेल तर त्यांनीही आता आमच्या प्रस्तावाला संमती द्यावी. आम्ही जास्त काही मागत नाही तर आमच्याच जागा मागत आहोत. आघाडी झाली तर आनंदच आहे; अन्यथा आमच्या सर्व प्रभागांतील उमेदवारांच्या याद्या तयार आहेत.
- रमेश बागवे,
शहराध्यक्ष, काँग्रेस