नेत्यांची पावले शहराकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2016 01:53 IST2016-06-24T01:53:32+5:302016-06-24T01:53:32+5:30

कार्यकर्ता मेळावा, प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने प्रमुख राजकीय पक्षांची वरिष्ठ नेतेमंडळी पिंपरी-चिंंचवड शहरात दाखल होत आहे

Leading the city to the leaders | नेत्यांची पावले शहराकडे

नेत्यांची पावले शहराकडे

पिंपरी : कार्यकर्ता मेळावा, प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने प्रमुख राजकीय पक्षांची वरिष्ठ नेतेमंडळी पिंपरी-चिंंचवड शहरात दाखल होत आहे. राजकीय समीकरणे जुळविण्याच्या उद्देशाने त्यांची पावले शहराकडे वळू लागल्याचे संकेत मिळू लागले आहेत.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची दोन वर्षांची कारकीर्द जनतेपर्यंत कशी पोहोचवायची, याचे धडे देण्यासाठी भाजपाचा पदाधिकारी मेळावा झाला. पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आवर्जून हजेरी लावली. आकुर्डीत सायंकाळी इफ्तार पार्टीचा कार्यक्रमसुद्धा झाला. भाजपाचे पदाधिकारी प्रशिक्षण होताच, दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार शहरात हजेरी लावणार आहेत. पिंपरी-चिंंचवड महापालिकेत १५ वर्षांपासून सत्तेच्या चाव्या हातात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेमध्ये गळती सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. देशात आणि राज्यात भाजपाची सत्ता असल्याने भाजपाचा उधळलेला वारू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धक्का देऊ शकतो. महापालिका निवडणूक
काही महिन्यांवर येऊन ठेवली
आहे, हे लक्षात घेऊन शरद पवार आवर्जून उपस्थित राहत असल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेसनेही चार दिवसांनी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. निवडणुकीच्या ऐन धामधुमीचा अपवाद वगळता काँग्रेसची वरिष्ठ नेतेमंडळी एरवी कधीही शहरात फिरकत नाही. पदाधिकारी, कार्यकर्तेच त्यांच्या भेटीला जातात. परंतु, या वेळी काँग्रेसनेसुद्धा आगामी महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब शिवरकर, चंद्रकांत हंडोरे, प्रवक्ते रत्नाकर महाजन, राजू वाघमारे, महाराष्ट्र सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष भूपेंद्र गुप्ता, अमरदीप पाटील हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
वरिष्ठ नेत्यांच्या शहर दौऱ्यांना महत्त्व प्राप्त झाले असून, अन्य पक्षांनी त्यांच्या पद्धतीने हालचालींना वेग दिला आहे. मनसे, शिवसेना या पक्षांनी आंदोलनाच्या माध्यमातून आपले अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Leading the city to the leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.