नेता, सेलिब्रिटी, खेळाडूंनी लस टोचून घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:12 AM2021-01-21T04:12:13+5:302021-01-21T04:12:13+5:30

तांत्रिक अडचणींचाही परिणाम : राजकारणी, खेळाडू, कलाकार यांच्या माध्यमातून जनजागृतीची गरज कोरोना लसीकरण : अफवा, भीती दूर कोण करणार? ...

Leaders, celebrities, players should be vaccinated | नेता, सेलिब्रिटी, खेळाडूंनी लस टोचून घ्यावी

नेता, सेलिब्रिटी, खेळाडूंनी लस टोचून घ्यावी

googlenewsNext

तांत्रिक अडचणींचाही परिणाम : राजकारणी, खेळाडू, कलाकार यांच्या माध्यमातून जनजागृतीची गरज

कोरोना लसीकरण : अफवा, भीती दूर कोण करणार?

प्रज्ञा केळकर-सिंग

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात लसीकरणाला अपेक्षेइतका प्रतिसाद मिळाला नाही. को-विन अ‍ॅपमधील तांत्रिक त्रुटी, अफवांचे पीक आणि भीती अशी कारणे यामागे असल्याचे सध्या तरी समोर येत आहेत. या शंका दूर करण्यासाठी राजकीय व्यक्ती, खेळाडू, कलाकार यांच्या माध्यमातून लसीकरणाचे महत्व अधोरेखित केल्यास पुढील टप्प्यात प्रतिसाद वाढेल, असे सांगितले जात आहे.

शहरात १६ जानेवारीला लसीकरणाचा पहिला, १९ जानेवारीला लसीकरणाचा दुसरा टप्पा पार पडला. पहिल्या दिवशी ५५ टक्के, तर दुसऱ्या दिवशी फक्त ३१ टक्के लसीकरण झाले. बुधवारी (दि. २०) झालेल्या लसीकरणात देखील ही टक्केवारी ३१ च्या पुढे गेली नाही.

लसीकरणासाठी निवडलेल्या आरोग्य सेवक-लाभार्थींना एसएमएस न जाणे, को-विन अ‍ॅप अपलोड न होणे, लसीकरणाच्या ठिकाणी ‘रियल टाईम एंट्री’ करता न येणे, लाभार्थींना लस दिल्यानंतर ‘को-विन अ‍ॅप’वर प्रमाणपत्र न मिळणे अशा तांत्रिक अडचणींमुळे लसीकरणाचा टक्का घसरल्याचे शासकीय पातळीवरुन सांगितले जाते.

औंध जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर म्हणाले, “लसीकरणाचे नियोजन आणखी काटेकोरपणे करावे लागणार आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना मेसेज वेळेवर न गेल्याने, लसीकरणाच्या दिवशी कोणी आजारी, तर कोणी बाहेरगावी गेले. सोशल मिडियातून पसरलेल्या अफवांचाही काही प्रमाणात परिणाम झाला. मात्र, अफवांमुळे घाबरुन जाऊ नये.”

‘को-विन अ‍ॅपच्या माध्यमातून संबंधितांना एक दिवस आधी लसीकरणासाठी येण्याचा मेसेज येतो. एखाद्याला मेसेज आल्यावर उपस्थित राहणे शक्य आहे की नाही, याबाबत फीडबॅक देण्याची सुविधा अ‍ॅप्लिकेशनमध्ये नाही. एखाद्याने नकार कळवल्यास अथवा शंका उपस्थित केल्यास त्याची दखल घेऊन पुढील व्यक्तींचे नियोजन करता येऊ शकते, असे आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले.

चौकट

लस सुरक्षित आहे, सुरक्षिततेची काळजी, दुष्परिणाम याबाबतच्या जनजागृतीसाठी शासनाने निवेदन काढले नाही. राजकीय व्यक्ती, खेळाडू आणि कलाकारांचा जनमानसावर मोठा पगडा असतो. स्थानिक ते राष्ट्रीय स्तरावरील नेते मंडळी लसीकरणासाठी पुढे आल्यास सामान्यांचा विश्वास बसेल. खेळाडू आणि कलाकारांसारख्या सेलिब्रिटींनी लस घेतल्यास किंवा लसीकरणाच्या जाहिराती केल्यास पुढील टप्प्यांमध्ये लसीकरणाचा टक्का नक्कीच वाढेल.”

- डॉ. अविनाश भोंडवे, राज्याध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन

चौकट

“लसीकरणाच्या नियोजनातील तांत्रिक त्रुटी दूर करणे ही शासनाची तर, लसीकरण हे राष्ट्रीय कर्तव्य मानून उपस्थिती वाढवणे ही आरोग्य कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे. कोणत्याही नव्या गोष्टीला विरोध करण्याची समाजाची मानसिकता असते. लस सुरक्षित असल्याचे मानवी चाचण्यांमध्ये सिध्द झाले असल्याने घाबरण्याची गरज नाही.”

- डॉ. विकास गुळवणी, जनरल फिजिशियन

Web Title: Leaders, celebrities, players should be vaccinated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.