समर्पित कार्यकर्ता असलेला नेता...
By Admin | Updated: January 14, 2017 02:46 IST2017-01-14T02:46:37+5:302017-01-14T02:46:37+5:30
किराणामालाचे दुकान, दोन खोल्यांचे घर अशा सर्वसामान्य घरातून राजकारणात आपले स्थान निर्माण केलेला, जातपात, पंथ विसरून

समर्पित कार्यकर्ता असलेला नेता...
किराणामालाचे दुकान, दोन खोल्यांचे घर अशा सर्वसामान्य घरातून राजकारणात आपले स्थान निर्माण केलेला, जातपात, पंथ विसरून काम करण्याच्या पद्धतीमुळे बहुजनांच्या मनात आपले स्थान निर्माण करणारा नेता म्हणून माजी मंत्री चंद्रकांत छाजेड यांचे नाव घ्यावे लागेल. समाजसेवेसाठी समर्पित व भारवले जाऊन काम करणारा नेता म्हणून त्यांच्याकडून नव्या राजकीय पिढीला घेण्यासारखे खूप आहे.
खरे तर त्यांचे जाणे तसे अकालीच म्हणावे लागेल. गेल्या आठवड्यातच त्यांची रुग्णालयात भेट घेतली. त्या वेळीदेखील ‘मी बरा झाल्यावर तुमच्या संस्थेच्या निवडणुकीचे राहिलेला काम उरकून घेऊ,’ असा त्यांचा ‘कामा’चा शब्द होता. राष्ट्रभाषा समितीचा अध्यक्ष म्हणून मी काम करीत आहे. या संस्थेची निवडणूक प्रलंबित असून, दोन-तीन महिन्यांपूर्वी त्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवड केली होती. आता ते काम राहिलेच. त्यानंतरही त्यांच्या मुलाच्या कार्य अहवाल प्रकाशनासाठी त्यांचा मला फोन आला. आपण आलात तर मुलाच्या कार्य अवाल प्रकाशनाला उंची लाभेल, असे त्यांचे म्हणणे होते. रुग्णालयात असतानाही त्यांना सतत कामाचीच ओढ होती. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाबरोबरच माझेदेखील वैयक्तिक नुकसान झाले आहे.
छाजेड व आमची मैत्र तब्बल ४५ वर्षांची. त्यानंतर आमचा घरोबादेखील झाला. त्यांच्याबरोबर व्यतीत केलेला काळ माझ्या झर्रकन समोर आला. चंद्रकांत छाजेड म्हणजे आमच्या सगळ्यांचा चंदू ! त्या वेळी ते आयएलएस लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. बोपोडीत त्यांचे रेशनिंगचे दुकान होते.
दोन खोल्यांच्या घरात त्यांचे वास्तव्य. मी त्या वेळी नाना पेठेत राहत असे. काँग्रेस सेवादल, त्यानंतर युवक काँग्रेस असे आम्ही एकत्र काम केले. हा काळ साधारण १९७०-७१चा असेल. त्या वेळी युवा कार्यकर्त्यांचे लॉ कॉलेजचे हॉस्टेल हेच केंद्र होते. त्या वेळपासून त्यांची कामाची हातोटी होती. कामाचा कधी कंटाळा असा त्यांनी केलाच नाही. वकिली करताना स्वकष्टाने वर्कशॉप केले. शेकडो गोरगरिबांचे खटले फुकट चालविले. इतकेच काय, तर अॅफिडेव्हीट अथवा तिकिटासाठी येणारा खर्चदेखील त्यांनी अनेकदा सोसला.
सर्वांमध्ये मिसळण्याच्या वृत्तीमुळे सर्वांच्या मनात त्यांनी वेगळे स्थान निर्माण केले होते. आत्ता प्रत्येत इच्छुक दिवाळीला उटणे-फराळ वाटपाचा कार्यक्रम घेतो; मात्र आम्ही १९७२-७३च्या दिवाळीत झोपडपट्टीत पहाटे पाचला उटणे वाटण्याचा कार्यक्रम केला होता. त्या वेळी ही गोष्ट नवीनच होती.
आजकाल धर्म-जाती यांवरून एक वेगळेच वातावरण झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, ते ज्या जैन धर्मातून आले आहेत, तो धर्म त्यांच्या मतदारसंघात हाताच्या बोटांवर मोजण्याइतका आहे. मात्र तरीही त्यांनी नगरसेवक, महापौर, आमदार व मंत्रिपदापर्यंत झेप घेतली. ते त्यांच्या भाषणाचा शेवट नेहमी ‘जय भीम’ या शब्दांनीच करीत. सर्वांशी मिळूनमिसळून वागण्याचा गुण त्यांच्या अंगी होता. गांधी विचारांवर त्यांची निष्ठा होती. त्यांच्या जाण्याने माझे वैयक्तिक नुकसान झाले आहे.