आघाडीही फिस्कटली

By Admin | Updated: February 2, 2017 03:56 IST2017-02-02T03:56:58+5:302017-02-02T03:56:58+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपाची युती फिस्कटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडीचीही चर्चा फिस्कटली आहे.

The lead is also Fiscal | आघाडीही फिस्कटली

आघाडीही फिस्कटली

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपाची युती फिस्कटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडीचीही चर्चा फिस्कटली आहे. सन्मानकारक जागा न मिळाल्याने आघाडीची चर्चा थांबली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक २१ फेब्रुवारीला होणार असून, युती आणि आघाडीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी गेल्या तीन महिन्यांपासून राष्ट्रवादीने काँग्रेसशी आघाडीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गणेशोत्सवाच्या आरतीपासून याबाबत चर्चा सुरू होती. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्यात चर्चा सुरू होती. चर्चेच्या पाच फेऱ्या झाल्या.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली असतानाही आघाडीबाबत निर्णय होत नसल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार अस्वस्थ होते. सर्वांना आघाडी कधी होणार? किंवा काय निर्णय होणार याबाबत उत्सुकता होती. मात्र, जागांच्या संख्येवरून आघाडीची चर्चा थांबवली आहे. सुरूवातीला राष्ट्रवादीने विद्यमान नगरसेवक, त्यांच्याकडे आलेले नगरसेवक असा फॉर्मुला मांडला होता. मात्र, त्यास काँग्रेसचा विरोध होता.
निवडणुकीसाठी १२८ पैकी पन्नास टक्के जागा द्याव्यात, अशी मागणी सुरुवातीला झाली. त्यानंतर पन्नास जागा, चाळीस जागा आणि तीस जागा अशीही मागणी केली. प्रभागांनुसारही चर्चा झाली. त्यामुळे याबाबत तोडगा निघेल, असे वाटत असतानाच आघाडीची चर्चा थांबली. (प्रतिनिधी)

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीबाबत चर्चेच्या पाच फेऱ्या झाल्या. आम्ही सुरुवातीला ६४, त्यानंतर पन्नास, त्यानंतर चाळीस आणि शेवटी तीस जागांची मागणी केली होती. मात्र, काँग्रेस पक्षाला वीस जागा देणे हे अपमानास्पद आहे. राष्ट्रवादी काँग्रेस भूतकाळात रमलेली आहे. तिला वर्तमानाचे भान नाही. मतदारांना ग्राह्य धरले जात आहे. याचे उत्तर भविष्यात निश्चित मिळेल.
- सचिन साठे, शहराध्यक्ष, काँग्रेस

महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी होणे गरजेचे होते. त्यानुसार चर्चाही झाली. प्रभागांनुसारही चर्चा केली. चर्चेत आम्ही विद्यमान नगरसेवक आणि आमच्याकडे आलेले नगरसेवक एवढ्या जागा मागून वीस जागा काँग्रेसला सोडण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, तो काँग्रेसला मान्य नाही. त्यामुळे चर्चा थांबली आहे. सन्मानपूर्वक लढत होईल.
- संजोग वाघेरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

Web Title: The lead is also Fiscal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.