सावकारकीचा झाला सुळसुळाट
By Admin | Updated: November 6, 2016 04:20 IST2016-11-06T04:20:05+5:302016-11-06T04:20:05+5:30
कमी कष्टात झटपट पैसे कमविण्यासाठी आता दहा ते चाळीस टक्के व्याजदराने पैसे कर्जरूपाने दिले जात आहेत. सावकारकीच्या माध्यमातून दहशत माजविण्याचा नवीन धंदा

सावकारकीचा झाला सुळसुळाट
सोमेश्वरनगर : कमी कष्टात झटपट पैसे कमविण्यासाठी आता दहा ते चाळीस टक्के व्याजदराने पैसे कर्जरूपाने दिले जात आहेत. सावकारकीच्या माध्यमातून दहशत माजविण्याचा नवीन धंदा सोमेश्वरनगर परिसरामध्ये सुरू झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात सावकारकीचा सुळसुळाट झाला आहे. नुकत्याच दाखल झालेल्या तक्रारीवरून हा विषय ऐरणीवर आला आहे.
दहा हजारांच्या कर्जापोटी महिन्याला व्याज दोन हजार आकारले जात आहे. आवाढव्य व्याजआकारणी करुन सोमेश्वरनगर परिसरामध्ये जवळपास दोन कोटी रुपये अवैध वाटप केल्याचा आकडा सूत्रांकडून समजत आहे.
कर्ज दहा हजाराचे व्याज वर्षाला नव्हे, महिन्याला १० ते ४० टक्के व्याजाच्या मोबदल्यात आतापर्यंत १ लाख दिले. तरीसुद्धा कर्ज अजून बाकीच असल्याचे वास्तव आहे. अशा जाळ्यात नागरिक अडकत आहेत. लाखो रुपयांचे भांडवल, सोबत दहशत मोठी असते. एखाद्याने कर्ज परत केलेच नाही तर या सावकाराच्या टगांची मजल कोणत्याही थराला जाऊ शकते.
हे सावकार सोशल मीडियावर वेगवेगळ्या नेत्यांच्या व गुंडप्रवृत्तीच्या लोकांचे फोटो टाकून समाजामध्ये दहशत पसरवितात. तक्रारच दाखल होत नसल्याने पोलीस यंत्रणाही हतबल झाली आहे.
सर्व यंत्रणांचा काणाडोळा...
सोमेश्वर कारखान्यांवरील सोमेश्वर कारखान्याच्या मालकीच्या दुकानातून सोमेश्वरनगर परिसरामधील सावकारी धंदा सुरू आहे. हे सर्वांना ज्ञात आहे. मात्र, याकडेही सर्वच यंत्रणांचा काणाडोळा होत आहे.
कधी मारहाण, कधी खोट्या तक्रारी
व्याजाने दिलेल्या पैशांचे व्याज व मुद्दल वेळेत न दिल्यास याची गुंडांमार्फत वसुली केली जात असल्याचे चित्र सर्रास पाहावयास मिळत आहेत. वेळप्रसंगी याचे रूपांतर हाणामारी तर कधी विनयभंगाच्या बोगस तक्रारी दाखल करण्यापर्यंत जात आहे.
तथ्य आढळल्यास कारवाई : पाटील
सहायक निबंधक यांची चौकशी सुरू आहे. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी केलेल्या चौकशीमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सहायक पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.