पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणीसाठा निम्म्यापेक्षा कमी असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व वॉशिंग सेंटर व जलतरण तलाव बंद करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी काढले आहेत. मात्र, बंदी झुगारून शहरामध्ये अनेक ठिकाणी वॉशिंग सेंटर सुरूच आहेत. त्यांच्या तपासणीसाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयस्तरावर भरारी पथके नेमण्यात आली असूनही त्यांच्याकडून फारशी तपासणी होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. धरणसाठ्यातील पाणी पुढील वर्षभर (१५ जुलै २०१६) पुरविण्याचे आव्हान महापालिका प्रशासनापुढे उभे ठाकले आहे. यादृष्टीने पाण्याचा गैरवापर रोखण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. त्याकरिता क्षेत्रीय कार्यालयस्तरावर भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. भरारी पथकांना ४ प्रकारच्या पाणी गैरवापराची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वॉशिंग सेंटर व जलतरण तलावासाठी होणारा पाण्याचा वापर अत्यावश्यक नसल्याने त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, शहरामध्ये सर्रास वॉशिंग सेंटर सुरू आहेत.गोखलेनगरमधील पंपिंग स्टेशनजवळील वॉशिंग सेंटर रविवारी दिवसभर सुरू होते. वाहनांच्या शोरूममधील वॉशिंग सेंटर सुरूच आहेत. कोथरूड, हडपसर, येरवडा, चंदननगर, वारजे, सिंहगड रस्ता उपनगरांमध्ये खुलेआमपणे वॉशिंग सेंटरमध्ये गाड्या धुतल्या जात आहेत.भरारी पथकांमध्ये गैरवापराच्या तपासणीसाठी जबाबदारी सोपविण्यात आलेल्या आहेत. झोपडपट्ट्यांमध्ये, सार्वजनिक ठिकाणचा गैरवापर रोखण्याची जबाबदारी अतिक्रमण निरीक्षकांना देण्यात आली आहे. व्यावसायिक इमारतीमध्ये पाण्याचा गैरवापर झाल्यास तसेच रस्त्यावर विनाकारण पाणी टाकल्याचे आढळून आल्यास प्रभाग अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, याची तपासणी योग्य पद्धतीने होत नसल्याने अनेक ठिकाणी पाण्याचा गैरवापर सुरूच आहे. शहरामध्ये कुठेही पाण्याचा गैरवापर होत असल्याचे तसेच गळती होत असल्याचे आढळून आल्यास नागरिकांनी ०२०-२५५०१३८३ / २५५०१३८६ या क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.(प्रतिनिधी)
बंदी झुगारून वॉशिंग सेंटर सुरूच
By admin | Updated: September 14, 2015 04:49 IST