माळीण पुनर्वसन अंतिम टप्प्यात
By Admin | Updated: January 26, 2017 00:09 IST2017-01-26T00:09:08+5:302017-01-26T00:09:08+5:30
माळीण पुनर्वसनाचे काम ९० टक्के पुर्ण झाले असून फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीत ग्रामस्थांना आपले हक्काचे घर ताब्यात देणार असल्याचे

माळीण पुनर्वसन अंतिम टप्प्यात
घोडेगाव : माळीण पुनर्वसनाचे काम ९० टक्के पुर्ण झाले असून फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीत ग्रामस्थांना आपले हक्काचे घर ताब्यात देणार असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले. माळीण पुनर्वसनाच्या सुरू असलेल्या कामाचा आढावा व पहाणी करण्यासाठी जिल्हाधिकारी माळीणमध्ये आले होते.
यावेळी उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे पाटिल, प्रांत अधिकारी कल्याण पांढरे, कार्यकारी अभियंता प्रशांत पाटिल, सिटी कॉर्पोरेशन अनिरूध्द देशपांडे, विवेक कुलकर्णी, तहसिलदार रविंद्र सबनिस, वनक्षेत्रपाल योगेश महाजन, नायब तहसिलदार विजय केंगले, शुभम डेव्हलपर्सचे विनय बडेरा इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जगन्नाथ अंकुश, सावळेराम लेंभे, कमाजी पोटे, गणेश पोटे इत्यादी ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, एकुण ६८ घरे बांधली जाणार असून सध्या ४४ घरांची कामे पुर्ण झाली आहेत व उर्वरीत कामे १० फेब्रुवारी पर्यंत पुर्ण होतील तसेच पायाभुत सोईसुविधांची कामे ८० टक्के पुर्ण झाली असून सर्व ठेकेदारांना १५ फेब्रुवारी पर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. कामांचा आढावा घेण्यासाठी दि.१० रोजी परत येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आत्ता पर्यंत झालेली सर्व कामे उत्तम दर्जाची झालेली असून हि कामे त्रयस्त यंत्रणे कडूनही तपासण्यात आली आहेत. यामध्ये कॉलेज आॅफ इंजिनीअरींग पुणे, इंपथी फौंडेशन यांनी कामे तपासून तसे प्रमाणपत्रही दिले आहे. घरांच्या रंगकामात व भिंती, समाजमंदिर, ग्रामपंचायत, शाळा, गोठा यांच्या भिंतीवर पर्यावरण पुरक कल्पनेवर चित्र काढली जाणार आहेत. या भिंतींवर माळीणचा इतिहास, घटने बद्दल माहिती, आदिवासी कला व संस्कृती दाखविणारी चित्र असतील.