शेवटच्या दिवशी साडेतीन लाख स्मार्ट मते
By Admin | Updated: October 13, 2015 01:26 IST2015-10-13T01:26:27+5:302015-10-13T01:26:27+5:30
केंद्र शासनाकडे सादर करावयाच्या स्मार्ट सिटी प्रस्तावासाठी दुसऱ्या टप्प्याच्या अखेरच्या दिवशी पुणेकरांनी ६ क्षेत्रांसाठी साडेतीन लाख स्मार्ट मते (प्राधान्यक्रम) नोंदवून एक विक्रम नोंदिवला आहे

शेवटच्या दिवशी साडेतीन लाख स्मार्ट मते
पुणे : केंद्र शासनाकडे सादर करावयाच्या स्मार्ट सिटी प्रस्तावासाठी दुसऱ्या टप्प्याच्या अखेरच्या दिवशी पुणेकरांनी ६ क्षेत्रांसाठी साडेतीन लाख स्मार्ट मते (प्राधान्यक्रम) नोंदवून एक विक्रम नोंदिवला आहे. पालिकेने राबविलेल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण १२ लाख ४६ हजार ८३९ मतांचा टप्पा गाठला आहे.
महापालिकेच्या वतीने दुसऱ्या टप्प्यात वाहतूक, पाणी व मलनिस्सारण, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण, सुरक्षितता, ऊर्जा या विषयांवर नागरिकांची आॅनलाइन मते मागविली होती. ३ ते १२ आॅक्टोबर २०१५ या कालावधीमध्ये ही मते जाणून घेण्यात आली.
या सर्व्हेक्षणात एकूण ९२ हजार ३३४ पुणेकरांनी सहभाग घेतला. स्मार्ट सिटीच्या संकेतस्थळाला २ लाख ६ हजार २६० हिट्स मिळाल्या. नागरिकांकडून व्यक्त केल्या गेलेल्या मतांच्या आधारे स्मार्ट पुण्याबाबतचा प्रस्ताव तयार केला जाणार आहे. वाहतूक, कचरा, पाणी, वीज, सुरक्षा लोकांची एकगठ्ठा मते आता पालिकेकडे उपलब्ध झाली आहेत.
केंद्र शासनाकडे महापालिकेला डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात स्मार्ट सिटीचा अंतिम प्रस्ताव सादर करायचा आहे.
त्याकरिता देशभरातील १०० शहरांमधून स्पर्धात्मक पद्धतीने पहिल्या २० शहरांची निवड केली जाणार आहे. या २० शहरांना पुढील ५ वर्षांत केंद्र शासनाकडून विविध अनुदान, तांत्रिक मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे.
केंद्र शासनाकडून शहरांमध्ये राबविला जाणारा हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.