‘लसयोग’ आज आहे, पण दुसरा डोसच ! तोही ८४ दिवस पूर्ण झालेल्यानांच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:11 IST2021-05-19T04:11:40+5:302021-05-19T04:11:40+5:30
पुणे : शहरात शनिवारपासून बंद असलेले लसीकरण बुधवारपासून (दि. १९) सुरू होत आहे. मात्र ११९ पैकी ७३ लसीकरण केंद्रांवरच ...

‘लसयोग’ आज आहे, पण दुसरा डोसच ! तोही ८४ दिवस पूर्ण झालेल्यानांच
पुणे : शहरात शनिवारपासून बंद असलेले लसीकरण बुधवारपासून (दि. १९) सुरू होत आहे. मात्र ११९ पैकी ७३ लसीकरण केंद्रांवरच लस उपलब्ध राहणार असून ती कोव्हिशिल्ड असेल. मात्र पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेल्यांनाच केवळ दुसरा डोस म्हणून ही लस दिली जाणार आहे. म्हणजेच ज्या ४५ वर्षांवरील नागरिकांनी २३ फेब्रुवारीपूर्वी पहिली लस घेतली अशा नागरिकांनाच बुधवारी लस मिळणार आहे.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, ४५ वर्षांवरील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, हेल्थ केअर वर्कर्स आणि आरोग्य कर्मचारी या लाभार्थ्यांनाच लस दिली जाणार आहे. पहिला डोस कुठेही दिला जाणार नाही. तसेच १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण अद्यापही पूर्णपणे बंद राहणार आहे. शहरातील कुठल्याही लसीकरण केंद्रावर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध नसेल, कोव्हिशिल्डचेच लसीकरण होईल.
लसीकरण केंद्रांवर १० टक्के लस ही ऑनलाईन अपॉईंटमेंट/ स्लॉट बुक केलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना दिली जाणार आहे. तर ९० टक्के लसीचे डोस हे ‘वॉक इन’साठी म्हणजेच ऑनलाईन नोंदणी शिवाय दुसऱ्या डोसकरिता आलेल्या नागरिकांना उपलब्ध असेल.
--------------
केवळ साडेसात हजार डोस प्राप्त
महापालिका आरोग्य विभागाला राज्य शासनाकडून मंगळवारी (दि. १८) सायंकाळी केवळ साडेसात हजार कोव्हिशिल्ड लसीचे डोस प्राप्त झाले आहेत. याचे वितरण शहरातील पंधरा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत समप्रमाणात करण्यात आले असून, प्रत्येक केंद्रास १०० लसीचे डोस देण्यात आले आहेत. या सर्व ठिकाणी लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे. २३ फेब्रुवारीनंतर लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची नोंदच कोविन पोर्टलवर होणार नाही, अशी रचना केंद्र सरकारने पोर्टलमध्ये अपडेट केली आहे.
-----------------------------