जिल्ह्यात सर्वाधिक वाहनचोरी बारामती शहरात
By Admin | Updated: September 13, 2015 00:31 IST2015-09-13T00:31:43+5:302015-09-13T00:31:43+5:30
देशाचे आणि राज्याचे राजकीय सत्ताकेंद्र, वेगाने वाढती औद्योगिक नगरी आणि कविवर्य मोरोपंतांचे नाव सांगणारे बारामती शहर गेल्या काही वर्षात वाहनचोरांचे

जिल्ह्यात सर्वाधिक वाहनचोरी बारामती शहरात
- सुनील राऊत, बारामती
देशाचे आणि राज्याचे राजकीय सत्ताकेंद्र, वेगाने वाढती औद्योगिक नगरी आणि कविवर्य मोरोपंतांचे नाव सांगणारे बारामती शहर गेल्या काही वर्षात वाहनचोरांचे प्रामुख्याने दुचाकी चोरांचे ‘माहेरघर’ बनले आहे. पुणे जिल्ह्यातील ३७ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत बारामती शहरात सर्वाधिक वाहनचोरीचे प्रकार घडत आहेत.
यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे ही वाहनचोरी रोखण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना केल्या गेल्यास राजकीय हस्तक्षेपामुळे माघार घ्यावी लागत आहे. त्यामुळे या वाहनचोरीने बारामतीकर हैराण झाले असले तरी, कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस यंत्रणेला हातावर हात ठेवून हे प्रकार पाहण्यापलीकडे काहीच करता आलेले नाही. शहराची लोकसंख्या तब्बल १ लाख २० हजारांच्या वर गेली आहे. काही वर्षांत शहरात वाहनचोरांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. गेल्या अडीच वर्षांत पुणे जिल्ह्यातील ३७ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सुमारे तीन हजार वाहनचोरीचे गुन्हे घडले असून, त्यातील सर्वाधिक म्हणजेच ४००हून अधिक गुन्हे एकट्या बारामती शहरात घडलेले आहेत. त्यातील केवळ ३० टक्केच गुन्ह्यांचा छडा लावणे बारामती शहर पोलिसांना शक्य झाले आहे.
राजकीय हस्तक्षेपामुळे कारवाईच बंद
एका पोलीस कर्मचाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात तपासणीसाठी ५० गाड्या पकडल्यास त्यातील ४५ गाड्या राजकीय कार्यकर्त्यांच्या फोनवर सोडाव्या लागतात. त्यामुळे आम्ही आता कारवाईच बंद केली असल्याचे सांगितले. त्यामुळे वाहनचोरांना मोकळे रान मिळाले असून, वाहनचोरी करून पोलिसांसमोरून ते पसार होत आहेत.
चोरी उघड होण्याचे प्रमाण नगण्य
शहर पोलिसांना या वाहनचोऱ्या थांबविण्यात अपयश येत असले तरी काही प्रमाणात या गुन्ह्यांची उकल करण्यात यश आलेले आहे. २०१३मध्ये २२ गुन्हे, २०१४ मध्ये ५६ गुन्हे तर आॅगस्ट २०१५ अखेरपर्यंत २६ चोरीच्या गुन्ह्यांची उकल बारामती पोलिसांनी केली आहे. मात्र, या वाहनांचे मालकच सापडत नसल्याने आता ही वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात ऊन, वारा, पावसात गंजत पडली आहेत.
‘आरटीओ’ही सुस्त
बारामती शहराच्या परिसरात वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे बारामती उपविभागीय प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाकडूनही शहरात नियमित तपासणी होताना दिसत नाही. बारामती शहरात वाहनांच्या नंबरप्लेटच्या नियमांना हरताळ फासून मोठ्या प्रमाणात फॅन्सी नंबरप्लेट बसविल्या आहेत. तर अनेक जुन्या गाड्या विना नंबरप्लेटच्या शहरात संचार करीत आहेत. प्रत्यक्षात अशा विना नंबरप्लेट वाहनांची तपासणी केल्यास अनेक वाहने चोरीची असल्याचे निदर्शनास येऊ शकते. मात्र, एकीकडे राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांनी हात वर केले आहेत तर दुसरीकडे परिवहन विभागही या प्रकाराकडे दुर्लक्ष करत आहेत.