भूमि अभिलेख कर्मचार्यांचा संप सुरू
By Admin | Updated: August 17, 2014 01:50 IST2014-08-17T01:49:42+5:302014-08-17T01:50:08+5:30
विविध मागण्यासाठी भूमि अभिलेख विभागातील कर्मचार्यांचा बेमुदत संप; भूमी अभिलेख विभागाचे जिल्ह्यातील कामकाज ठप्प.

भूमि अभिलेख कर्मचार्यांचा संप सुरू
अकोला : विविध मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी भूमि अभिलेख विभागातील कर्मचार्यांनी शनिवारपासून बेमुदत संप सुरू केला आहे. त्यामुळे भूमी अभिलेख विभागाच्या जिल्ह्यातील कार्यालयांमध्ये कामकाज ठप्प झाले आहे.
भूमि अभिलेख विभागाला तांत्रिक खाते म्हणून मान्यता देण्यात यावी, शेतमोजणी, शहर मापन, गावठाण मोजणी, भूसंपादन मोजणी तसेच कार्यालयीन तांत्रिक कामे करणार्या तृतीय श्रेणी संवर्गातील कर्मचार्यांना सिव्हिल पदवीधारक, उपअभियंताप्रमाणे तांत्रिक वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांच्या प्रमुख मागण्यांसह विविध १५ मागण्या मंजूर करण्याच्या मागणीसाठी विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या अकोला जिल्हा शाखेच्यावतीने शनिवार, १६ ऑगस्टपासून बेमुदत संप सुरू केला आहे.
या संपात जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी सहभागी झाल्याने भूमी अभिलेख विभागाच्या जिल्हा अधीक्षक, तालुका भूमी अभिलेख कार्यालय अंतर्गत कामकाज ठप्प झाले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शेतजमीन मोजणी, शहर विभागातील भूमापन मोजणी, मिळकत पत्रिकांची नक्कल, फेरफार नोंदी भूसंपादनाची कामे इत्यादी प्रकारचे कामकाज ठप्प झाले आहे. संपामुळे कामकाज ठप्प झाले असून, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.संपात सहभागी झालेल्या भूमी अभिलेख कर्मचार्यांनी भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिली. त्यामध्ये संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विशाल वरकडे,जे.एस.शिंदे, व्ही.के. जाधव, डी.आर.सोळंके, एन.यू.पारधी, बी.एम.गवई, एस.के.टाले, एन.एम.मोरे, स्वाती जांभुरकर, पुनम देवाते, ए.ए.परतेकी, स्वाती ताथोड सहभागी झाले होते.