नारळाच्या करवंटीतून साकारले दिवे
By Admin | Updated: January 7, 2015 00:58 IST2015-01-07T00:58:43+5:302015-01-07T00:58:43+5:30
नारळाचा उपयोग अनेक कारणांसाठी केला जातो. खोबरेच नाही तर नारळाच्या काथ्यापासून देखील अनेक शोच्या वस्तू तयार केल्या जातात.

नारळाच्या करवंटीतून साकारले दिवे
पुणे : नारळाचा उपयोग अनेक कारणांसाठी केला जातो. खोबरेच नाही तर नारळाच्या काथ्यापासून देखील अनेक शोच्या वस्तू तयार केल्या जातात. परंतु कात्रजमधील तुकाराम बोबे यांनी नारळाच्या करवंटीपासून नक्षीदार दिवे तयार केले आहेत.
नारळ फोडल्यानंतर करवंटी टाकूनच दिली जाते. करवंटीपासून काही शोभेच्या वस्तू किंवा दिवा तयार करण्याची कल्पना खरोखरीच वेगळी आहे. यासंदर्भात ‘लोकमत’शी बोलताना बोबे यांनी सांगितले, की २० ते २५ वर्षांपूर्वी टिळक स्मारक मंदिरात टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनविल्याचे प्रदर्शन पाहिले होते. त्यावरूनच करवंटीपासून पहिल्यांदा नारळाच्या झाडाच्या आकाराचे पेन स्टँड तयार केले.
मग संपूर्ण करवंटीपासून दिवे करण्याची कल्पना डोक्यात आली. करवंटीवर छोट्या ड्रिलच्या साह्याने नक्षीकाम केले आणि वरती बल्ब सोडण्यासाठी जागा ठेवली. अशा प्रकारे करवंटीपासून दिवा बनविला. हे सर्व करताना एक रुपयाचाही खर्च आला नाही. मार्केटमधून खराब नारळ आणायचे. त्याची करवंटी व्यवस्थित काढून घ्यायची व दोन एमएम ड्रिलच्या साह्याने त्यावर नक्षीकाम करून दिवे बनविले. हातात पकडता येईल अशी छोटी ड्रिल मशीन असल्याने इलेक्ट्रिसिटीचीसुद्धा गरज लागली नाही. टेल्कोमध्ये टर्नरचे काम करायचो; त्यामुळे हत्यारे कशा प्रकारे वापरायची माहीत होते. करवंटीवर नक्षीकाम करताना कशा प्रकारची ड्रिल मशीन लागेल याचा विचार करून त्यानुसार स्वत: ड्रिल मशिन तयार केली. त्यामुळे अगदी बारीक कोरीव कामसुद्धा करता आले. शाळेमध्ये शिकविलेल्या सुतारकामाचा देखील उपयोग झाल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
४लोकांना वाढदिवसाच्या निमित्ताने करवंटीचे दिवे देतो. विक्रीसाठी नाही तर केवळ एक छंद म्हणून हे दिवे तयार करतो. ही कला शिकण्यासाठी माझ्याकडे अनेक लोक येतात; पण मी शिकवणीचे पैसे घेत नाही. आपली कला जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायला पाहिजे आणि त्याचे जतन झाले पाहिजे एवढेच वाटते, असे ते म्हणाले.
४ ख्रिसमसमुळे अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे दिवे तयार करण्यासाठी सांगितले आहे. त्यानुसार करवंटीवर स्टार, क्रॉस यांसारखे डिझाइन कोरून खाली पत्रिकेपासून तयार केलेल्या चांदण्या लटकविलेल्या आहेत. त्यामुळे ख्रिसमस लँप आकर्षक दिसत आहे.