लाखो वैष्णवांचा मेळा पंढरीच्या वाटेवर
By Admin | Updated: July 11, 2015 04:15 IST2015-07-11T04:15:12+5:302015-07-11T04:15:12+5:30
श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या १८५ व्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याने शुक्रवारी (दि. १०) सकाळी सहाला लाखो वैष्णवांसह आजोळघरातून पंढरीचा मार्ग धरला.

लाखो वैष्णवांचा मेळा पंढरीच्या वाटेवर
शेलपिंपळगाव : श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या १८५ व्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याने शुक्रवारी (दि. १०) सकाळी सहाला लाखो वैष्णवांसह आजोळघरातून पंढरीचा मार्ग धरला. प्रस्थानापूर्वी रात्री एक वाजता माऊलींच्या पादुकांना रुद्राभिषेक करून पंचामृत पूजा, पंचपक्वान्न नैवेद्य, आरती, पसायदान घेण्यात आले.
संपदा सोहळा नावडे मनाला !
लागला टकळा पंढरीचा !!१!!
जावे पंढरीशी आवड मनाशी !
कधी एकादशी आषाढी !!२!!
तुका म्हणे ऐसे आर्त ज्यांचे मनी !
त्यांचे चक्रपाणी वाट पाहे !!३!!
अशाच पद्धतीची भावना अलंकापुरीत दाखल झालेल्या सर्व वारकऱ्यांमध्ये दिसून येत होती. ज्ञानेश्वर महाराजांचा १८५ वा आषाढी पायीवारी पालखी प्रस्थान सोहळा लाखो वैष्णवांसह आजपासून पंढरीच्या वाटेवर मार्गस्थ झाला. गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता आजोळघरात विसावलेल्या या सोहळ्यात माऊलींच्या पादुकांचे लाखो वारकऱ्यांनी अगदी सहज व सुलभ दर्शन घेतले. प्रस्थान सोहळ्यादरम्यान बंद केलेली दर्शनरांग प्रस्थानानंतर मोठ्या गतीने दर्शनासाठी आत घेण्यात येत होती. माऊलींच्या दर्शनासाठी दिवसभर लांबच - लांब रांगा लागलेल्या असतानाही रात्री प्रस्थान सोहळ्यानंतर वाढत होत्या.
धन्य आज संतदर्शनाचा !
अनंत जन्मीचा शीण गेला !!
मज वाटे त्यांशी आलिंगन द्यावे !
कदा न सोडावे चरण त्यांचे!!
या अभंगाप्रमाणे प्रत्येक वारकरी माऊलींचे दर्शन घेण्यासाठी कासावीस होऊन त्यांच्या चरणावर माथा टेकून स्वत:ला धन्य करून घेत होता. संपूर्ण अलंकापुरी चैतन्यमय, धार्मिक वातावरणात दंग झाली होती. शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता परंपरेनुसार शितोळे सरकारांचा माऊलींच्या पालखीला नैवेद्य दाखविण्यात आला. पावणेसहाच्या दरम्यान शितोळे सरकारांचे अश्व आजोळघरी आणून, गांधीवाड्यात त्यांना मानपान देण्यात आले.
त्यानंतर माऊलींची पालखी आळंदी ग्रामस्थ व मानकऱ्यांच्या खांद्यावर घेऊन नगरपालिकेसमोर सजविलेल्या रथात विराजमान करण्यात आली. वाजत-गाजत हा पालखी सोहळा पुढे धाकट्या
पादुका व नंतर साई मंदिरासमोर थोरल्या पादुकांशेजारी जाऊन विसावला. या ठिकाणी देवाची
आरती घेण्यात आली. आरतीनंतर साडेनऊच्या सुमारास पालखी पुण्याकडे मार्गस्थ झाली. नवमी व दशमीला हा सोहळा पुण्यात
भवानी पेठ, तर एकादशीला सासवडनगरीत मुक्काम करणार आहे.
दरम्यान, केंदूर (ता. शिरूर) येथील श्री संतश्रेष्ठ कान्होराज महाराजांची पालखी सकाळी
सहाला पुण्याकडे मार्गस्थ
झाली. (वार्ताहर)