शेतातले मजूर निघाले प्रचाराला
By Admin | Updated: February 15, 2017 01:56 IST2017-02-15T01:56:11+5:302017-02-15T01:56:11+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची धामधूम सुरू असल्याने मजुरांना अच्छे दिन आले असून ते मजुरीला टाळून विविध पक्षांच्या प्रचारात

शेतातले मजूर निघाले प्रचाराला
पेठ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची धामधूम सुरू असल्याने मजुरांना अच्छे दिन आले असून ते मजुरीला टाळून विविध पक्षांच्या प्रचारात सहभागी होत आहेत. जिल्हात सर्वत्र निवडणुकीची धामधूम सुरू आहे. ग्रामीण भागात सुगीचे दिवस सुरू असून गहू, ज्वारी, हरभरा आदी पिके काढणीला आलेली आहेत. मात्र मजुरी करून मिळणाऱ्या पैशांपेक्षा निवडणुकीत प्रचार करून जास्त पैसे मिळत असल्याने मजुरांनी लगेच मजुरीचे दर वाढवले. मजुरांचे अव्वाच्या सव्वा भाव वाढल्याने शेतकरी मात्र हतबल झाला आहे.
शेतात काम करण्यासाठी मजुरांना १५० ते २०० रुपये शेतकऱ्यांकडून मिळतात. परंतु या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत या मजुरांचा भाव ३०० ते ५०० रुपये असा झाला असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. दिवसभर उन्हातान्हात शेतात काम करायचे व १५० ते २०० रुपये घ्यायचे. मात्र या निवडणुकीत मजुरांचे भाव अव्वाच्या सव्वा झाले आहेत. कुठल्याही पक्षाच्या प्रचारासाठी रोख स्वरूपात ३०० ते ५०० रुपये रोजंदारी दिली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतकामासाठी मजूर मिळेनासे झाले आहेत.
सलगच्या दोन-तीन वर्षांच्या दुष्काळात शेतकरी पुरता होरपळून निघाला आहे. यंदा पिकेही चांगली आली आहेत. काही ठिकाणी पिकांची काढणीदेखील सुरू झाली आहे. परंतु पुरेसे मजूर मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. (वार्ताहर)