दूधभेसळ रोखणार फिरती प्रयोगशाळा

By Admin | Updated: May 20, 2014 03:59 IST2014-05-20T03:59:13+5:302014-05-20T03:59:51+5:30

दुधासह अन्नधान्यातील भेसळ रोखण्यासाठी राज्यात चार फिरत्या प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत

The laboratory will stop milk powder | दूधभेसळ रोखणार फिरती प्रयोगशाळा

दूधभेसळ रोखणार फिरती प्रयोगशाळा

पुणे : दुधासह अन्नधान्यातील भेसळ रोखण्यासाठी राज्यात चार फिरत्या प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे अन्नपदार्थातील भेसळीची जागेवरच तपासणी करणे शक्य होणार आहे. येत्या आठवड्यात या प्रयोगशाळा सुरू होणार असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) सह आयुक्त शशिकांत केकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. केकरे म्हणाले, भेसळीचे प्रकार रोखण्यासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाच्या सहकार्याने व्हॅनमध्ये प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. दुधात केली जाणारी खाद्यतेल, युरिया, पाणी अशा सर्व प्रकारची भेसळ तपासता येणार आहे. तसेच रवा, मैदा, आटा, मिरची पावडर, तूप अशा खाद्यान्नात केली जाणारी भेसळदेखील ओळखता येणार आहे. दररोज शंभर ते सव्वाशे नमुने तपासण्याची त्याची क्षमता असेल. ठाणे, मुंबई येथे एक, नाशिक,औरंगाबाद, पुणे येथे दोन व नागपूर, अमरावती विभागासाठी एक फिरती प्रयोगशाळा असेल. प्रत्येक व्हॅनमध्ये एक तज्ज्ञ केमिस्टची नेमणूक करण्यात आली आहे. लवकरच या फिरत्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून अन्नधान्य तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. दुध भेसळीच्या राज्यात अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. एफडीएने दोन वर्षांत पुणे विभागातच कमी प्रतिचे ३० हजार लिटर दूध नष्ट केले आहे. याप्रकरणी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यात भेसळीचे प्रकार रोखण्यास प्रभावी उपाययोजना करण्याची सूचना न्यायालयाने केली होती.

Web Title: The laboratory will stop milk powder