पुणे: कुणाल कामरा च्या एका विडंबन गीताने दोन्ही शिवसेनांमध्ये धूम उडाली. शिंदेसेनेच्या पाठिराख्यांनी कुणाल कामराला हिसका दाखवण्याचा इशारा दिला तर उद्धवसेनेने त्याला पाठिंबा दर्शवला. महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडल्याने शांत बसलेल्या या दोन्ही पक्षांमध्ये या विडबंन गीताने जीव आणला.
दिल तो पागल है या चित्रपटातील आँखो मे मस्ती... या गाण्याच्या चालीवर ठाणे की रिक्षा.... असे विडंबनगीत कुणाल कामराने सादर केले. यात शिवसेनेतील फुटीपासून गुवाहाटी दौरा व नंतरची सत्ताप्राप्ती असे सगळे वर्णन गाण्याच्या चालीवर पद्यात्मक शब्दांमध्ये चपखलपणे बसवले आहे. त्यात कोणाचेही नाव नाही, मात्र घडलेला घटनाक्रम सगळा व्यवस्थितपणे दिला आहे.
त्यामुळेच नाव नसूनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते भडकले. मुंबईत कामराच्या स्टुडिओची तोडफोड झाली तर इथे पुण्यात शिंदेसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी कामराला आम्ही शिवसेनेचा हिसका दाखवूच असे म्हणत त्याचा निषेध केला. समाजमाध्यमांवर पोस्ट व्हायरल करत भानगिरे यांनी कामराने पुण्यात येऊन दाखवावे असे आव्हान दिले. खरी शिवसेना कोणती याचा निर्णय जनतेने दिले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वांना राज्यातील जनतेने बहुमताने निवडून दिले आहे. कामरा त्यांचा नाही तर जनतेचा अवमान करत आहे असे भानगिरे ‘लोकमत’ बरोबर बोलताना म्हणाले.
दुसरीकडे उद्धवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे यांनी त्या गाण्यात कोणाचेही नाव नाही, तरीही हे का चिडले? असा प्रश्न केला. याचा अर्थ गाण्यात वर्णन केले ते लोक हेच असावेत असे ते म्हणाले. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकारी आहे. कामरा यांनी पद्यात्मक भाषेत आपले मत व्यक्त केले. त्यात कोणालाही शिवी नाही किंवा कसली असभ्य भाषाही नाही. तरीही त्यांना कोणी आव्हान वगैरे देत असेल तर शिवसेना कामरा यांच्याबरोबर आहे, असे त्यांनी ‘लोकमत’ बरोबर बोलताना सांगितले.
कलाकारांची चुप्पी
हा विषय राजकारणाशी संबधित असल्याने नेहमीप्रमाणेच सांस्कृतिक क्षेत्रातील कोणीही यावर बोलायला तयार नाही. काही जणांबरोबर संपर्क साधला असता त्यांनी यावर आम्हाला बोलायचे नाही असे स्पष्टपणे सांगितले. कलाकारांना स्वातंत्ऱ्य असावे मात्र आपली कला त्यांनी अशी राजकीय टिकेसाठी वापरावी का यावर कलाक्षेत्रातील लोकांचे दुमत नाही. का नाही? असा प्रतिप्रश्न काहीजण करतात, तर त्यात कलात्मकता असतेच असे नाही. असे मत काहीजणांनी व्यक्त केले.