कोरेगाव भीमा : तलाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी गावात येत नाही. त्यांनी कोऱ्या सात-बारा उताऱ्यावर सह्या करून ठेवल्या असल्याने त्यांचे कामकाज कोतवालच करीत आहे. ही वस्तुस्थिती वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील आहे. अशा तलाठ्यांना निलंबित करण्याची मागणी माजी सरपंच प्रफुल्ल शिवले यांनी केली आहे. तलाठी रोहिणी बोरा यांच्याकडे पिंपळे जगताप-वाजेवाडी या दोन गावांचा पदभार आहे. ८ जुलैपासून त्यांच्याकडे वढू बुद्रुक-आपटी या सजाचाही अधिकचा पदभार देण्यात आला. मात्र, वढू-आपटी या गावांचा सजा घेताना बोरा यांनी मंगळवार व शुक्रवार हे दोनच दिवस वढू बुद्रूक कार्यालयात उपलब्ध असल्याने शेतकरी व नागरिकांना तलाठ्यांची वाट पाहावी लागत आहे. वढू बुद्रूकचे माजी सरपंच प्रफुल्ल शिवले, माजी सरपंच अंकुश शिवले, सरपंच निर्मला शिवले, उपसरपंच संतोष शिवले यांनी वारंवार तलाठी बोरा यांना कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयात हजर राहण्याची विनंती केली आहे. मात्र, त्या फक्त दोनच दिवस गावात येत असत, तर काही वेळेस पंधरा-पंधरा दिवस येत नाहीत. शेतकरी, विद्यार्थी, नागरिकांना सात-बारा उतारा, ८ अ उतारे, रहिवाशी दाखल्यांसाठी पिंपळे जगताप या ठिकाणीच बोलवत असल्याने नागरिकांना नाहक हेलपाटे मारावे लागत आहेत. नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्याने बोरा यांनी चक्क कोरे सात-बारा उतारे, आठ अ उतारे व रहिवासी दाखल्यांवर सह्या करून ठेवल्या होत्या. कोऱ्या सातबारे उताऱ्यांमुळे कोतवाल सातबारा उताऱ्यांमध्ये फेरबदल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे कोरे सातबारा उतारे, दाखले जप्त करण्याची मागणी करतानाच नोंदीसाठी नागरिकांकडे पैशांची मागणी करण्याचाही आरोप शिवले यांनी केला आहे. महसूलमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडेही तक्रार करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
तलाठी घरी अन् कामकाज पाहतोय कोतवाल!
By admin | Updated: October 13, 2015 00:40 IST