पुणे : राज्याची आर्थिक स्थिती यंदाही सुस्थितीत असल्याने रेडी रेकनर दरात कोणताही बदल न करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे परिणामी सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. २०२२-२३ मध्ये लागू असलेले रेडीरेकनरचे दर यंदाही शहरात कायम राहून खरेदी विक्री होणार असल्याने यंदा किमान सव्वा लाख नवीन घरांची खरेदी होईल, असा अंदाज क्रेडाईतर्फे व्यक्त करण्यात आला आहे. तर २०२२-२३ च्या रेडीरेकनर दरांनुसार शहरात कोरेगाव पार्क परिसर हा सर्वांत महागडा आहे. त्याखालोखाल प्रभात रस्ता दुसऱ्या स्थानी कायम आहे.
कोरोनामुळे १ एप्रिल २०२० ऐवजी सप्टेंबर २०२० मध्ये रेडीरेकनर दरात वाढ करण्यात आली होती. गेल्या वर्षी म्हणजेच २०२१-२२ या आर्थिक वर्षात रेडीरेकनरचे दर ‘जैसे थे’ ठेवण्यात आले होते. कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती चांगली नव्हती, तरीही गेल्या वर्षी २०२२-२३ राज्यात रेडीरेकनरच्या दरात सरासरी ५ टक्के वाढ करत राज्य सरकारने नागरिकांना धक्का दिला होता. मात्र, आता आगामी निवडणुका विचारात घेऊन राज्य सरकारने रेडीरेकनरच्या दरात कोणताही बदल केलेला नाही.
रेडीरेकनरमध्ये कोणताही बदल न केल्यामुळे गेल्या वर्षीचेच दर आगामी वर्षभरासाठी लागू होणार असल्याने उच्चभू लोकवस्ती असलेला कोरेगाव पार्क परिसर हा सर्वांत महागडा असणार आहे. त्याखालोखाल प्रभात रस्त्याचे दुसरे स्थान कायम आहे. त्यानंतर भांडारकर रोड, लॉ कॉलेज रोड, बोट क्लब, जंगली महाराज रस्ता, कर्वे रोड, फर्ग्युसन रोड हेदेखील महागड्या परिसराच्या रांगेत आहेत.
पुण्यातील दरवाढ
महापालिका क्षेत्रात ५ टक्के मुद्रांक शुल्कासह स्थानिक स्वराज्य संस्था कर १ टक्का व मेट्रो अधिभार १ टक्का असा ७ टक्के दर लागू असेल. प्रभाव क्षेत्र अर्थात महापालिका क्षेत्रात नव्याने समाविष्ट झालेला भाग ५ टक्के (स्थानिक स्वराज्य संस्था कराच्या अधिभारासह) व ग्रामीण भागासाठी ५ टक्के (स्थानिक स्वराज्य संस्था कराच्या अधिभारासह) मुद्रांक शुल्क वाढ आकारण्यात येणार आहे.
शहरात दरवर्षी १ लाख ते १ लाख १० हजार घरांची विक्री होते. यंदा दरवाढ न झाल्याने सामान्यांचा घरखरेदीकडे कल वाढून त्यात किमान १५ ते २० टक्के विक्री वाढून सव्वा लाख नवीन घरे विकली जातील, असा अंदाज आहे. तर जुन्या घरांच्या विक्रीतही १५ ते २० टक्क्यांची वाढ होईल. - रणजित नाईकनवरे, अध्यक्ष, क्रेडाई, पुणे