आरोग्य केंद्र की कोंडवाडा
By Admin | Updated: February 2, 2015 23:10 IST2015-02-02T23:10:53+5:302015-02-02T23:10:53+5:30
प्रसूती होऊन शस्त्रक्रिया झालेल्या ९ महिला व एक पुरुष एकाच खोलीत जमिनीवर टाकलेले, एका बाजूला पाण्याची टाकी, तर औषधांचे बॉक्स अस्ताव्यस्त पडलेले...

आरोग्य केंद्र की कोंडवाडा
भोर : प्रसूती होऊन शस्त्रक्रिया झालेल्या ९ महिला व एक पुरुष एकाच खोलीत जमिनीवर टाकलेले, एका बाजूला पाण्याची टाकी, तर औषधांचे बॉक्स अस्ताव्यस्त पडलेले...हवेसाठी खिडकीही..सर्वत्र पसरलेला उग्रवास ,अशी अवस्था आहे नसरापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची.
हे आरोग्य केंद्र आहे की कोंडवाडा, हे येथे पाहणी केल्यानंतर प्रश्न पडतो. अशा परिस्थितीत महिला व लहान बाळांना तेथे ठेवून वैद्यकीय अधिकारी व आरोग्यसेविका गायब असल्याचे वास्तव आहे.
आज दुपारी भोर पंचायत समिती अंर्तगत असणाऱ्या या आरोग्य केंद्राला भेट दिली असता ही भयानक स्थिती समोर आली आहे. येथील रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी येथील सेवेबद्दल तक्रारींचा पाढाच वाचला.
हे आरोग्य केंद्र संस्थानकालीन इमारतीत आहे. सदरची इमारत धोकादायक झाली असून, रुग्ण ठेवण्यास जागाच नाही. या केंद्रांर्तगत ४५ गावे येत असून, तीन वैद्यकीय अधिकारी मंजूर असताना २ कार्यरत आहेत. दररोज साधारणपणे ८० ते ९० जणांची ओ.पी.डी होते.
केंद्रात प्रसूतीसाठी व शस्त्रक्रियेसाठी आलेल्या ९ महिलांना व एका पुरुषाला खोलीतील कॉट काढून जमिनीवर गादी टाकून शेजारी शेजारी ठेवले होते. तिथेच लहान बाळं, त्यांची माता व नातेवाईक होते. खिडकी नसल्याने उग्रवास येत असून, कोंडल्यासारखे होते. औषधांचे बॉक्स व पिण्याचे पाणी यामुळे अधिकच अडचण आहे. कोंडवाड्यात जनावरे बांधावी तसे रुग्णांना ठेवले होते. याचे काही घेणे-देणे डॉक्टर व कर्मचाऱ्यांना नाही. (वार्ताहर)
आरोग्य केंद्राला गावात जागा उपलब्ध नाही. जुन्या एसटी डेपोजवळची जागा पशुसंवर्धन विभागाने जिल्हा परिषदेला देण्याची मागणी केली होती. त्या बदल्यात जिल्हा परिषदेने भोर येथील जागा पशुसंवर्धन विभागाला दिली आहे. मात्र, पशुसंवर्धन विभाग ती जागा देत नाही. त्यामुळे आरोग्य केंद्राची इमारत निधी असूनही रखडली आहे.जिल्हा परिषदेतून दुरुस्तीसाठी मंजूर केलेल्या ७ लाखांचे कामही निकृष्ट झाले आहे.
- कुलदीप कोंडे,
जिल्हा परिषद सदस्य
नसरापूर आरोग्य केंद्रात गैरहजर असणारे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे एक दिवसाचे वेतन कपात करून नोटीस देऊन कारवाई करणार आहे.
- डॉ. सुर्दशन मालाजुरे , तालुका आरोग्य अधिकारी