कोल्हापुरच्या तोडीस तोड मतदानामुळे आघाडीची उमेद वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:22 IST2020-12-03T04:22:17+5:302020-12-03T04:22:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत झालेल्या विक्रमी मतदानानंतर राजकीय कार्यकर्त्यांमध्ये पैजा लागल्या ...

कोल्हापुरच्या तोडीस तोड मतदानामुळे आघाडीची उमेद वाढली
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत झालेल्या विक्रमी मतदानानंतर राजकीय कार्यकर्त्यांमध्ये पैजा लागल्या आहेत. दोन्ही मतदारसंघातील पुणे आणि कोल्हापुर मतदारसंघात जोरदार मतदान झाले. पुणे जिल्ह्यात जोरदार मतदान करुन घेऊन बाजी मारण्याची भाजपाची रणनिती होती. मात्र कोल्हापुरात त्याच तोडीचे मतदान झाल्याने महाआघाडीची उमेद वाढली आहे.
पदवीधर मतदारसंघात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना महाआघाडीचे उमेदवार अरुण लाड आणि भाजपा उमेदवार संग्राम देशमुख यांच्यात जोरदार चुरस आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मतदार असल्याने या जिल्ह्यावर भाजपाने विशेष जोर दिला होता. प्रत्यक्ष मतदानात पुणे आणि कोल्हापुर या दोन्ही जिल्ह्यात प्रत्येकी साठ हजारांपेक्षा जास्त मतदान झाले. यामुळे पदवीधर मतदारसंघाचा निकाल आता केवळ पुणे जिल्ह्यावर अवलंबून राहिलेला नाही.
अन्य उमेदवार किती मते घेतात यावरही लाड आणि देशमुख यांचा विजय अवलंबून आहे. मनसेच्या रुपाली पाटील, संभाजी ब्रिगेडचे श्रीमंत कोकाटे यांच्यासह नीता ढमाले, निशा बिडवे आणि शरद पाटील या पाच उमेदवारांना मिळणारी मते लाड आणि देशमुख यांच्या निकालावर परिणाम करणार आहेत.
“पुण्यात झालेल्या एकूण मतदानापैकी सर्वाधिक मतदान हे आमचेच असेल”, असा दावा भाजपा कार्यकर्ते करत आहेत. त्याचवेळी कोल्हापुरातली वाढलेले मतदान मात्र महाआघाडीसाठी लाभदायक ठरण्याची शक्यताही भाजपाच्या गोटातून व्यक्त होत आहे. महाआघाडीला सातारा आणि सांगलीतूनही चांगला पाठींबा मिळण्याची आशा आहे. सोलापुरातून अपेक्षेपेक्षा चांगले मतदान मिळण्याची खात्री भाजपा कार्यकर्ते बोलून दाखवतात.
शिक्षक मतदारसंघात अभूतपूर्व मतदान झाल्याने ‘पदवीधर’च्या मतदानाचाही टक्का वाढला आहे. याचा नेमका लाभ कोणाला होणार, याबद्दल मात्र दोन्ही पक्ष साशंक आहेत. पुण्यात जोरदार आघाडी मिळवून कोल्हापुरात बरोबरी जरी साधली तरी पहिल्या फेरीतच विजयी होऊ, असा विश्वास भाजपा कार्यकर्ते व्यक्त करतात. कोल्हापुरातल दमदार आघाडी घेत सातारा-सांगलीतल्या थोड्याशा मताधिक्याच्या बळावर आम्हीच बाजी मारु, असे ‘महाआघाडी’चा अंदाज आहे.
चौकट
पुणे जिल्ह्यात झालेल्या एकूण मतदानापैकी निम्मे म्हणजे सुमारे तीस हजार मतदान ग्रामीण भागात आणि पिंपरी-चिंचवड परिसरात झाले आहे. पुणे शहरातील जास्तीत जास्त मतदान भाजपाचे असल्याचा दावा केला जात असला तरी ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवडमधील मतदान भाजपाचे गणित बिघडवू शकते.
चौकट
पदवीधर मतदारसंघात पुणे शहरातून मनसेच्या रुपाली पाटील आणि संभाजी ब्रिगेडचे श्रीमंत कोकाटे यांच्याशिवाय निशा बिडवे, नीता ढमाले हे उमेदवार होते. पुण्यातील उमेदवारांची संख्या जास्त असल्याने मतदानाचा टक्का वाढल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हे मतदान दोन प्रमुख उमेदवारांशिवाय इतर उमेदवारांना जाणार आहे. याचा फटका कोणाला बसणार हे गुरुवारी रात्री उशीरा किंवा शुक्रवारी स्पष्ट होईल.
चौकट
मतदानाची अंतिम टक्केवारी
पुणे पदवीधर मतदारसंघ
जिल्हा एकूण मतदान टक्केवारी
पुणे ६१ हजार ४०४ ४४.९५
सातारा ३४ हजार ४२१ ५८.२७
सांगली ५६ हजार ७४३ ६५.०५
सोलापूर ३३ हजार ५२० ६२.२९
कोल्हापूर ६० हजार ९६२ ६८.०९
----------------------------------------------
एकूण २ लाख ४७ हजार ५० ५७.९६
पुणे शिक्षक मतदारसंघ
जिल्हा एकूण मतदान टक्केवारी
पुणे १८ हजार ८४९ ५८.५४
सातारा ६ हजार ३२० ८१..९६
सांगली ५ हजार ६५१ ८२.९६
सोलापूर ११ हजार ५५८ ८५.०९
कोल्हापूर १० हजार ६०९ ८६.७०
------------------------------------------------
एकूण ५२ हजार ९८७ ७३.०४