‘नॅक’मुळे विद्यापीठ झाले चकाचक

By Admin | Updated: January 23, 2017 02:45 IST2017-01-23T02:45:32+5:302017-01-23T02:45:32+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला नॅशनल असेसमेंट अ‍ॅण्ड अ‍ॅक्रिडिटेशन कौन्सिलची (नॅक) समिती भेट देणार असल्याने विद्यापीठाचा

'Knack' became the University of Chakachak | ‘नॅक’मुळे विद्यापीठ झाले चकाचक

‘नॅक’मुळे विद्यापीठ झाले चकाचक

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला नॅशनल असेसमेंट अ‍ॅण्ड अ‍ॅक्रिडिटेशन कौन्सिलची (नॅक) समिती भेट देणार असल्याने विद्यापीठाचा परिसर चकाचक करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शैक्षणिक माहितीबरोबरच विद्यापीठाकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधांना नॅक समितीकडून गुण दिले जाणार आहेत. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत विद्यापीठाचा परिसर नीटनेटका करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.
नॅक समितीकडून येत्या २३ ते २५ जानेवारी या कालावधीत विद्यापीठाची तपासणी केली जाणार आहे. विद्यापीठाने गेल्या काही महिन्यांपासून शैक्षणिक माहिती जमा करण्यास; तसेच विद्यापीठाचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या.
विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमधील सभागृहात २३ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता समितीच्या सदस्यांसमोर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे व इतर अधिकारी सादरीकरण करणार आहेत. त्यानंतर समितीकडून विद्यापीठातील विविध विभागांना भेटी दिल्या जातील. समितीकडून पायाभूत सुविधा, संशोधनाचा दर्जा, विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजना, शिष्यवृत्ती आदी बाबींची तपासणी केली जाते. त्यामुळे विद्यापीठाने नॅक समितीसाठी लागणारी सर्व माहिती तयार करून ठेवली आहे. विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी
तसेच विद्यापीठाबाहेरील अधिकाऱ्यांनी तपासणीची ‘रंगीत तालीम’ केली आहे.
विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासूनच ते मुख्य इमारतीपर्यंतचा परिसर स्वच्छ केला जात आहे. नॅकमुळे रविवारी सुद्धा विद्यापीठाचे कामकाज सुरू राहणार आहे. तसेच, सोमवारी सकाळी ८ वाजल्यापासून कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याच्या सूचना विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
विद्यापीठाकडे तयारीसाठी काही तास उरलेला असल्याने विद्यापीठाचे अधिकारी लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. रस्त्यालगतच्या झाडांना, तसेच विद्यापीठातील इमारतींच्या भिंतींना रंगरंगोटी केली जात आहे. तसेच, सुशोभीकरणासाठी विविध ठिकाणी फुलांच्या कुंड्या ठेवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे विद्यापीठाचा चेहरामोहरा बदलल्याचे दिसून
येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Knack' became the University of Chakachak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.