रासपच्या तालुकाध्यक्षांची केली हकालपट्टी
By Admin | Updated: February 13, 2017 01:28 IST2017-02-13T01:28:58+5:302017-02-13T01:28:58+5:30
सतत पक्षविरोधी भूमिका घेऊन पक्ष, पक्षाध्यक्षांच्या प्रतिमेला हानी पोहोचविल्याचा ठपका ठेवून रासपचे तालुकाध्यक्ष माणिक काळे

रासपच्या तालुकाध्यक्षांची केली हकालपट्टी
बारामती : सतत पक्षविरोधी भूमिका घेऊन पक्ष, पक्षाध्यक्षांच्या प्रतिमेला हानी पोहोचविल्याचा ठपका ठेवून रासपचे तालुकाध्यक्ष माणिक काळे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. वडगाव निंबाळकर-मोरगाव जिल्हा परिषद गटातील काळे यांच्या उमेदवारीला रासपचे कार्यकर्ते ठामपणे विरोध करणार आहेत, अशी माहिती पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्ष माणिकराव दांगडे पाटील यांनी दिली.
शनिवारी (दि. ११) पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक पार पडली. या वेळी बारामतीसह इंदापूर, पुरंदर आदी तालुक्यांतील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. तालुक्यातील वडगाव निंबाळकर, मोरगाव गटातील पक्षाचे उमेदवार व तालुकाध्यक्ष माणिक काळे यांनी ऐनवेळी पक्ष बदलला. तसेच अन्य पक्षाकडून उमेदवारी जाहीर केली. यासाठी महायुतीमध्ये मोठ्या भावाची भूमिका असलेल्या पक्षाने विश्वासघात केल्याची भावना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तालुकाध्यक्ष काळे यांनी रासपचा वापर केवळ स्वत:पुरता केला. पक्षसंघटन वाढू दिले नाही. कधी राष्ट्रवादी, तर कधी अन्य पक्षांबरोबर साटेलोटे करुन पक्ष आणि पक्षाध्यक्षांच्या प्रतिमेला हानी पोहोचविण्याचे काम केले. वेळोवेळी त्यांची ही भूमिका स्पष्ट झाली आहे. त्यांच्या या पक्षविरोधी कारवायांची आजच्या बैठकीत नोंद घेऊन काळे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. निवडणुकीत मित्रपक्षांबरोबर महायुती करायची, मात्र प्रत्यक्षात छोट्या मित्रपक्षांना संपविण्याचे धोरण ठेवायचे. याबाबत बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली, अशी माहिती दांगडे पाटील यांनी दिली. या वेळी प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब केसकर, प्रदेश सरचिटणीस प्रा. अण्णासाहेब रुपनवर, नितीन धायगुडे, संदीप चोपडे आदी उपस्थित होते.