शाळांत किचनशेड बनली ‘गोडाऊन’
By Admin | Updated: February 2, 2016 01:16 IST2016-02-02T01:16:33+5:302016-02-02T01:16:33+5:30
विद्यार्थ्यांना शाळेतच सकस आहार मिळावा, या हेतूने शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत जिल्ह्यात अनेक ठिकाणी किचन शेड उभारण्यात आली खऱ्या

शाळांत किचनशेड बनली ‘गोडाऊन’
पुणे : विद्यार्थ्यांना शाळेतच सकस आहार मिळावा, या हेतूने शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत जिल्ह्यात अनेक ठिकाणी किचन शेड उभारण्यात आली खऱ्या; मात्र अनेक ठिकाणी पोषण आहार न शिजवता गोडाऊनसारखा शेडचा वापर होत असल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आलेली आहे. त्याच वेळी काही तालुक्यांमध्ये मात्र त्याचा चांगला वापर होत असल्याचेही दिसून आले आहे.
जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी तसेच ग्रामीण भागातील मुलांना सकस आहार मिळावा, या हेतून राज्य शासनाने शालेय पोषण आहार योजना सुरू केली. सुरवातीला बचत गटांतील महिलांच्या साह्याने शाळेतच आहार शिजवला जात होता. सुरुवातीला ही योजना प्रभावीपणे चालली. दुपारच्या जेवणात विद्यार्थ्यांना खिचडी दिली जात होती; मात्र तिच्या दर्जाबाबत तसेच धान्य निकृष्ट असल्याच्या तक्रारी वाढल्या. त्यामुळे प्रसंगी बचत गटाच्या महिलांना पदरचे पैसे खर्च करूनही विद्यार्थ्यांना भोजन द्यावे लागत होते.
ही योजना प्रशासकीय उदासीनतेमुळे रखडली. बचत गटांची बिले वेळेवर निघत नसल्याने अनेक ठिकाणी पोषण आहार शिजणे बंद झाले. यातून मार्ग काढण्यासाठी शासनातर्फे शाळेतच किचनशेड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी शाळांना निधीही देण्यात आला. शाळेच्या आवारातच हे किचनशेड उभारण्यात आले. या किचनशेडसाठी गॅसजोड तसेच सिलिंडरही देण्यात आले. मात्र, या किचनशेडचा वापर काही शाळांनी चक्क गोडाऊनसारखा केल्याचे लोकमतच्या पाहणीत आढळले.
शालेय पोषण आहार तयार करणाऱ्या स्वयंपाकी मदतनिसांना मिळणारे मानधन अत्यल्प असल्याने हा आहार शिजवणेच बंद केले आहे. किचनशेड जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच तेथे शालेय पोषण आहार शिजविण्याबाबतचे नियोजनही आवश्यक आहे. पोषण आहार शिजविण्यासाठी किचन शेड असले तरीही अनेक शाळांतून किचनशेडमध्ये पोषण आहार शिजवलाच जात नाही.
...अन्यथा मुख्याध्यापकांवर कारवाई
जिल्ह्यातील काही शाळांची पाहणी केली.
त्यात काही शाळांमध्ये किचनशेडचा वापर हा गोडाऊनसारखा केला जात असल्याचे आढळले. यामुळे काही ठिकाणी ही शेड वापराअभावी पडून आहे. मुलांना शाळेतच आहार मिळावा, या हेतूने या किचनशेडची उभारणी करण्यात आली आहे. शिक्षणाधिकाऱ्यांसोबत याबाबत बैठक घेऊन हा आहार किचनशेडमध्येच शिजवण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या शाळा या सूचनांचे पालन करणार नाहीत, त्यांच्या मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
- शुक्राचार्य वांजळे,
उपाध्यक्ष, जिल्हा परिषद