कीर्तनकार ताराताई देशपांडे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:09 IST2021-05-31T04:09:43+5:302021-05-31T04:09:43+5:30
पुणे : महाराष्ट्रातील नारदीय कीर्तन परंपरेतील ज्येष्ठ कीर्तनकार ताराताई राजाराम देशपांडे (वय ८२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ...

कीर्तनकार ताराताई देशपांडे यांचे निधन
पुणे : महाराष्ट्रातील नारदीय कीर्तन परंपरेतील ज्येष्ठ कीर्तनकार ताराताई राजाराम देशपांडे (वय ८२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, तीन विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
गेली सहा दशकांहून अधिक काळ अखंडपणे त्यांनी कीर्तनसेवा केली. श्रीहरिकीर्तनोत्तेजक सभा श्री नारद विद्या मंदिर संस्थेच्या कार्याध्यक्षा म्हणून त्या कार्यरत होत्या. अनेक वर्षे त्यांनी कीर्तन अध्यापनाचे कार्य श्री नारद मंदिरात केले. कीर्तन क्षेत्रातील केलेल्या भरीव कार्याबद्दल त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. त्यांच्या कीर्तनसेवेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात त्यांचा शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या वतीने ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी व अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. राज्य शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार मिळविणाऱ्या त्या पहिल्या महिला नारदीय कीर्तनकार ठरल्या. शृंगेरी व करवीर पीठाच्या शंकराचार्यांनीही त्यांचा सन्मान केला होता.
ताराताईंच्या निधनाने कीर्तन विश्वातील तारा निखळला,नारदीय कीर्तनातील ज्ञानज्योत मालवली, अशा शब्दांत शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. ताराताईंचे जाणे हे स्त्री कीर्तनकारांना आपले मातृछत्र हरपल्यासारखे आहे. नारद मंदिराला या काळात बसलेला हा चौथा मोठा धक्का आहे, असे नारद मंदिराच्या सचिव जयश्री देशपांडे यांनी सांगितले.
-----------------------