जनवाडीतील तरूणीला बेदम मारहाणीचा प्रकार
By Admin | Updated: March 12, 2015 06:18 IST2015-03-12T06:18:52+5:302015-03-12T06:18:52+5:30
गोखले नगर येथील जनवाडीमध्ये राहणाऱ्या एका १९ वर्षीय तरूणीला ५ ते ६ मुलांच्या टोळक्याकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना

जनवाडीतील तरूणीला बेदम मारहाणीचा प्रकार
पुणे : गोखले नगर येथील जनवाडीमध्ये राहणाऱ्या एका १९ वर्षीय तरूणीला ५ ते ६ मुलांच्या टोळक्याकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. याविरूध्द जनवाडी पोलीस चौकीमध्ये ती तरूणी तक्रार द्यायला गेली असता पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ती तरूणी गरवारे महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे.
मारहाण झालेल्या मुलीच्या वडीलांचा बेकरीचा व्यवसाय आहे. बेकरीच्या दुकानात ती मुलगी वडिलांना मदत करते. बुधवारी सायंकाळी ती तरूणी दुकानात एकटी असताना ५ ते ६ जण तिच्या दुकानामध्ये आले. त्यांनी तिला बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये तरूणीच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या आहेत. पोलिसांकडे याविरोधात ती मुलगी तक्रार द्यायला गेली असता तिला पोलिसांनी व्यवस्थित सहकार्य केले नाही. रात्री उशीरा याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास सुरूवात करण्यात आली. याबाबत जनवाडी पोलीस चौकीच्या अधिकाऱ्यांची संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. जनवाडी पोलीस चौकीमध्ये रात्री फोन उचलला जात नव्हता, अनेकवेळा फोन करूनही त्याला प्रतिसाद मिळाला नाही. रात्री उशिरा विनोद गायकवाड या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
(प्रतिनिधी)